भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, December 28, 2011

५४६. यस्य न ज्ञायते शीलं न कुलं न च संश्रय: |

न तेन संगतिं कुर्यात् इत्युवाच बृहस्पति: ||

अर्थ

[देवांचा राजनीतीचा गुरु] बृहस्पती म्हणतो कि ज्याचे चारित्र्य ठाऊक नाही; घराणे माहित नाही; तो कोणाच्या आश्रयाने राहतो ते माहित नाही; त्याच्या बरोबर संबंध जोडू नयेत.

Tuesday, December 27, 2011

५४५. कृते प्रतिकृतिं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम् |

न तत्र दोषं पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत् ||

अर्थ

[जो जसं] वागेल त्याला [तशीच] परतफेड करावी. [त्यांनी] हिंसा केल्यास त्यावर हिंसेनेच जवाब द्यावा. त्यात मला दोष दिसत नाही. दुष्ट माणसांशी दुष्टपणेच वागावे.

Monday, December 26, 2011

५४४. नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले |

नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ||

अर्थ

सीतेने वाटेत टाकलेले दागिने दाखवल्यावर लक्ष्मण म्हणतो ." मला [वहिनीच्या] वाकी माहित नाहीत. [मी त्या ओळखू शकणार नाही.] कर्णभूषणे सुद्धा माहित नाहीत. नेहमी चरणांना नमस्कार केल्यामुळे पैंजण मात्र मी ओळखतो. [मोठी वहिनी म्हणून लक्ष्मण नेहमी नमस्कार करत असे.]

५४३. उद्बोधकं प्रेरकं च रञ्जकं ज्ञानदं तथा |

चतुर्विधं हि वक्तृत्वं सर्वमेकत्र दुर्लभम् ||

अर्थ

वक्तृत्वामधे चार [गुण] असतात ते म्हणजे [चांगला] उपदेश असले; [कुठल्यातरी चांगल्या गोष्टीला] प्रवृत्त करेल; मनोरंजन करेल, त्याचप्रमाणे [कधीकधी] माहिती मिळते. पण या चारही गोष्टी एकत्र असणं हे फारच दुर्मिळ आहे.

Friday, December 23, 2011

५४२. दण्डश्चेन्न भवेल्लोके विनश्येयु: इमा: प्रजा: |

जले मत्स्यानिवाऽभक्ष्यन् दुर्बलान्बलवत्तरा: ||

अर्थ = जर दण्ड [शिक्षा] नसेल तर प्रजेचा नाश होईल. पाण्यात ज्याप्रमाणे मोठे मासे लहान माशांना खातात त्याप्रमाणे सामर्थ्यवान लोक दुबळ्यांचा नाश करतील.

५४१. दण्ड: शास्ति प्रजा: सर्वा: दण्ड एवाभिरक्षति |

दण्ड: सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः ||

अर्थ

सर्व प्रजेवर [अन्याय केल्यास] शिक्षा असा दंडक असतो तो दण्ड [प्रशासनाचे नियम आणि त्यानुसार शिक्षा] सर्वांचे रक्षण करतो. झोपलेल्यांचे [अज्ञानी जनांचे] बाबतीत दण्डच जागृत असतो. विद्वान लोक दंडाला धर्माप्रमाणे मन देतात.

Thursday, December 22, 2011

५४०. उत्तमं प्रणिपातेन शूरं भेदेन योजयेत् |

नीचमल्पप्रदानेन समशक्तिं पराक्रमै: ||

अर्थ

थोर लोकांशी वागताना नमस्काराने [आदराने वागून त्यांच मन] जिंकावं; पराक्रमी असेल तर भेदाचा वापर करावा; [त्याच्याशी भांडण काढल्यास तो भारी पडतो; म्हणून दुसर निमित्त काढावं] क्षुद्र व्यक्तीला थोडसं देऊन गप्प करावं. जो बरोबरीचा असेल त्याच्याशी आपला पराक्रम दाखवून त्याला जिंकावं.

५३९. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित: |

अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशो हि दुस्तर: ||

अर्थ

विद्वान मनुष्य सर्व नाहीसं होण्याची वेळ आली असता अर्ध टाकून, [उरलेलं वाचवतो] त्या बचावलेला अर्ध्याने तो आपला कार्यभाग पुरा करतो. कारण सगळंच गेलं तर त्यातून मार्ग काढणं अतिशय कठीण असतं.

Tuesday, December 20, 2011

५३८. उपाध्यायान्दशाचार्य आचार्याणां शतं पिता |

सहस्रं तु पितृन् माता गौरवेणातिरिच्यते ||

अर्थ

उपाध्यायापेक्षा गुरु दहापटीने, गुरुपेक्षा पिता शंभरपटीने, तर पित्यापेक्षा हजारपटीने माता श्रेष्ठ आहे.

५३७. आचार: कुलमाख्याति वपुराख्याति भोजनम् |

वचनं श्रुतमाख्याति स्नेहमाख्याति लोचनम् ||

अर्थ

घरंदाजपणा वागणुकीवरून समजतो, तब्बेतीवरून जेवण काय जेवता ते कळतं, सुशिक्षितपणा समजतो तो बोलण्या चालण्या वरून, किती प्रेम आहे ते डोळ्यावरून कळतं.

Monday, December 19, 2011

५३६. न दैवमेव संचित्य स्वोद्यमं मानवस्त्यजेत् |

अनुद्यमेन किं तैलं तिलेभ्यो लभ्यते क्वचित् ||
अर्थ

[फक्त] नशिबाचाच [नशीब देईल असा] विचार करून मनुष्याने आपला प्रयत्न सोडू नये. [जसं] प्रयत्न केल्याशिवाय तिळापासून तेल कधी मिळते काय?

५३५. आदौ चित्ते तत: काये सतां संजायते जरा |

असतां च पुन: काये नैव चित्ते कदाचन ||

अर्थ

सज्जनाच्या बाबतीत म्हातारपण हे आधी मनाला आणि नंतर शरीराला येत. पण दुष्ट लोकांच्या बाबतीत मात्र त्यांच शरीरच म्हातार होत, मन कधीच [जर्जर] होत नाही. [त्यांच्या वासना नाहीशा होत नाहीत. सज्जन आहे त्यात समाधानी राहतात.]

Friday, December 16, 2011

५३४. वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति |

नद्यो घना मत्तगजा वनान्ता: प्रियाविहीना: शिखिन: प्लवङ्गा: ||

अर्थ

रामायणातील पावसाळ्याचे वर्णन - नद्या वहात आहेत, ढग वर्षाव करीत आहेत, मस्त हत्ती चीत्कार करत आहेत, मोर नाचत आहेत, माकडे [स्वस्थ] बसली आहेत, विरही जन प्रियकराचे चिंतन करत आहेत. [सर्व क्रियापदे आधी आणि कर्ते नंतर ओळीनी आले आहेत - यथासांख्य अलंकार ]

Thursday, December 15, 2011

५३३. नरा: सुरा वा पशव: परेऽपि वा; न निन्दनीया: पुरुषेण भूष्णुना |

यतोऽत्र दोषप्रचुरे जगत्त्रये न सन्ति ते वीतगुणा: कलावपि ||

अर्थ

स्वतः प्रगतीची इच्छा करणाऱ्या माणसाने मानव, देव, राक्षस अथवा इतर कोणाचीही निंदा करू नये कारण या कलीयुगात सुद्धा; या दोषांनी भरलेल्या जगात गुणहीन असा कोणीच नसतो. [त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करून गुणाचा उपयोग करून घ्यावा]

५३२. गुणदोषौ बुधो गृह्णन् इन्दुक्ष्वेडाविवेश्वर: |

शिरसा श्लाघते पूर्वं परं कण्ठे नियच्छति ||

अर्थ

भगवान शंकराने ज्याप्रमाणे चन्द्र आणि विष यांना न्याय दिला आहे त्याप्रमाणे शहाण्या माणसाने करावे. पहिल्याला [चंद्राला देवानी] मस्तकावर स्थान दिलं आहे तर विष गळ्यातच रोखल आहे. [आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो तर चांगल्याच सन्मान करावा पण वाईट मात्र पोटातच घेऊ नये; कोणाला सांगू पण नाही गळ्यापाशीच राखावं]

Tuesday, December 13, 2011

५३१. एष वन्ध्यासुतो याति खपुष्पकृतशेखर: |

कूर्मक्षीरचये स्नात: शशशृङ्गधनुर्धर: ||

अर्थ

सशाच्या शिंगाचं धनुष्य घेऊन; डोक्यावर आकाशपुष्पे माळून; विपुल अशा कासवाच्या दुधात नाहून हा वांझोटीचा मुलगा चालला आहे. [तत्वज्ञानी लोक जग हा असा आभास आहे असं सांगतात; वदतो व्याधात असं अशा वाक्यांना म्हणतात]

५३०. जले तैलं खले गुह्यं पात्रे दानं मनागपि |

प्राज्ञे शास्त्रं स्वयं याति विस्तारं वस्तुशक्तित: ||

अर्थ

पाण्यात पडलेलं तेल; दुष्ट माणसाला कळलेलं लहानसं रहस्य; लायक व्यक्तीला केलेल थोडसं दान आणि हुशार माणसाला सांगितलेलं शास्त्र या गोष्टी अगदी छोट्या असल्या तरी त्या विस्तार पावतात. [पाणी; वाईट व्यक्ती; सत्पात्री केलेले दान; बुद्धिमान माणूस यांच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत सामर्थ्यामुळे सहवासात आलेल्या गोष्टींचा विस्तार होतो.]

५२९. मनस्वी म्रियते कामं कार्पण्यं न तु गच्छति |

अपि निर्वाणमायाती नानलो याति शीतताम् ||

अर्थ

मनस्वी [कणखर मनाचा] माणूस [आपल्या ध्येयासाठी] खुशाल मरतो, [कष्ट सोसून अगदी हलाखीच्या परिस्थितीत जातो.] पण लाचारपणा करीत नाही. अग्नि विझून जाईल पण थंड होत नाही.

५२८. उग्रत्वं च मृदुत्वं च समयं वीक्ष्य संश्रयेत् |

अन्धकारमसंहृत्य नोग्रो भवति भास्कर: ||

अर्थ

काळवेळेचा विचार करून [माणसाने] कठोरपणे किंवा मृदुतेने वागले पाहिजे. सूर्य अंधार नाहीसा करेपर्यंत तीव्रतेने तळपत नाही. [सकाळची किरणे कोवळी असतात.]

Friday, December 9, 2011

५२७. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवा: |

फलं पापस्य नेच्छन्ति पापं कुर्वन्ति नित्यशः ||

अर्थ

पुण्य [कृत्य] करण्याची माणसाची इच्छा नसते त्याला [फक्त] पुण्यकृत्याचे फळ [स्वर्ग; मोठेपणा ] हवा असतो. पापाचं फळ त्यांना नको असतं पण ते नेहमी पाप मात्र करत असतात.

Thursday, December 8, 2011

५२६. माधुर्यमक्षरव्यक्ति: पदच्छेदस्तु सुस्वर: |

धैर्यं लयसामर्थ्यं च षडेते पाठके गुणा: ||

अर्थ

[वाचनात] गोडवा; स्पष्ट उच्चार; सर्व शब्द [नीट] वेगवेगळे [उच्चारणे] धीटपणा; चांगला आवाज आणि लय पकडणं या सहा गोष्टी हे अभिवाचन करणाराचे [मन्त्र म्हणणारा; शिक्षक यांचे] गुण आहेत.

Wednesday, December 7, 2011

५२५. हरे: पादाहति: श्लाघ्या न श्लाघ्यं खररोहणम् |

स्पर्धापि विदुषा योग्या न योग्या मूर्खमित्रता ||

अर्थ

सिंहाने लत्ताप्रहार केला तरी स्तुत्य आहे, पण गाढवाच्या पाठीवर बसणे कौतुकास्पद नाही. मूर्खांशी मैत्री करणं बरोबर नाही विद्वानांशी स्पर्धा केली तरी चांगलं आहे.

५२४. निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् |

अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: ||

नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ = वानोत निन्दोत सुनीतिमंत चळो असो वा कमला गृहात | हो मृत्यू आजिची घडो युगांती सन्मार्ग सोडोनी भले न जाती || वामन पण्डित

Monday, December 5, 2011

५२३. गुणा: कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सताम् |

केतकीगन्धमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदा: ||

अर्थ

लांबवर रहात असले तरी सज्जनांचे गुण त्यांची [कीर्ति पसरण्यासाठी] दूताचे काम करतात. [दूर वर असला तरी] केवड्याचा सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी भ्रमर स्वतःहून येतात.

५२२. गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिवः ।

शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन ||

अर्थ

गुरु म्हणजे आपले आई वडील आहेत, गुरु प्रत्यक्ष शंकर आहे. जरी ईश्वर आपल्यावर रागावला तरी गुरु निश्चितपणे आपले रक्षण करेल. पण गुरु जर आपल्यावर रागावला तर आपले रक्षण साक्षात ईश्वर सुध्दा करु शकणार नाही.

५२१. चातकस्त्रिचतुरान् पय:कणान् याचते जलधरं पिपासया |

सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारताम् ||

अर्थ

तहान लागल्यामुळे चातक पक्षी जल धारण करणाऱ्या [मेघा] कडे दोन - चार पाण्याचे थेंब [अगदी थोड पाणी] मागतो, तरीसुद्धा तो ढग सम्पूर्ण जग पाण्याने भरून टाकतो. अबब! केवढा हा थोर लोकांचा उदारपणा! [चातक पक्षी फक्त ढगातून पडणारे पावसाचे पाणीच पितो अशी कवि कल्पना आहे.]

५२०. शत्रोरपि गुणा ग्राह्या दोषा वाच्या गुरोरपि |

सर्वथा सर्वयत्नेन पुत्रे शिष्ये हितं वदेत् ||

अर्थ

चांगले गुण जरी शत्रु असला तरी त्याच्या पासून सुद्धा घ्यावे; मोठी माणसं [आपल्यापेक्षा] असली तरी त्यांचे दोष [गोड भाषेत] सांगावेत. आपला शिष्य किंवा मुलगा [अपत्य] हर तऱ्हेने; सगळ्या बाजूंनी प्रयत्न करून त्याच्या कल्याणाचे सांगावे.

५१९. य: पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुपाश्रयते |

तस्य दिवाकरकिरणै: नलिनीदलमिव विकास्यते बुद्धि: ||

अर्थ

जो वाचन करतो; लिखाण करतो; निरीक्षण करतो; [मनात आलेल्या शंका] विचारतो; ज्ञानी लोकांचा आश्रय घेतो त्याची बुद्धी, सूर्यकिरणांमुळे कमळाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे विकसित होतात त्याप्रमाणे विकास पावते.

Thursday, December 1, 2011

५१८. यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् |

हितं च परिणामे यत् तत् अद्यं भूतिमिच्छता ||

अर्थ

समृद्धीची इच्छा करणाऱ्या माणसाने [शक्य गोष्टींपैकी] जेवढा घास [तोंडात मावेल; पकडता येईल] आणि खाल्ला [पळवला] असता पचेल; शेवटी कल्याणकारक होईल तेवढंच खावं [ताब्यात घ्यावं].

Wednesday, November 30, 2011

५१७. आयाधिको व्ययं कुर्वन् को न याति दरिद्रताम् |

आयो व्ययाधिको यस्य स धनी न धनी धनी ||

अर्थ

मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारा कोण बरे गरीब होत नाही? खर्चापेक्षा जास्त मिळकत असणारा [खरा] श्रीमंत होय [खूप] संपत्ती असून [खर्च अजून जास्ती करणारा] नव्हे.

५१६. यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् |

तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ||

अर्थ

ज्याप्रमाणे हजारो गाईन्मधून वासरू [आपली] आई मिळवतं, [शोधून काढतं] त्याप्रमाणे प्रारब्ध ते करणाऱ्याच्या पाठोपाठ येत.

Monday, November 28, 2011

५१५. निर्वनो हन्यते व्याघ्र: निर्व्याघ्रं भिद्यते वनम् |

तस्मात् व्याघ्रो वनं रक्षेत् वनं व्याघ्रं च पालयेत् ||

अर्थ

अरण्यात नसलेला [गावात शिरल्यावर] वाघ मारला जातो. [आणि] ज्या अरण्यात वाघ नाही [तिथली झाडी कसली भीती नसल्यामुळे] तोडली जाते. [तो भाग उजाड होतो म्हणजे खरं तर ] वाघ जंगलाच रक्षण करतो. [म्हणून] वाघ आणि अरण्य यांचे रक्षण करावे.

५१४. य: स्वभावो हि यस्यास्ति स नित्यं दुरतिक्रम: |

श्वा यदि क्रियते राजा स किं नाश्नात्युपानहम् ||

अर्थ

जो माणसाचा मूळचा स्वभाव असतो त्याच्यावर मात करण [फार] कठीण असतं. कुत्र्याला जरी राजा बनवलं तरी तो चपला चाटणार नाही काय? [तो तसच करेल]

५१३. अनेकसंशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम् |

सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यन्ध एव स: ||

अर्थ

दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी [सुद्धा] दाखवणारा; अनेक शंकांचे निरसन करणारा - शास्त्र हा - सर्वांसाठी डोळाच आहे. जो [ते] शिकला नाही तो आंधळाच होय.

Friday, November 25, 2011

५१२. यौवनं धनसम्पत्ति: प्रभुत्वमविवेकिता |

एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ||

अर्थ

तारुण्य; श्रीमंती; सत्ता आणि अविचारीपणा यापैकी एक गोष्ट सुद्धा संकटाला कारणीभूत होते, तर चार ही जेथे असतील तेथे अनर्थ होईल यात काय संशय?

५११. अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् |

प्राप्नोति बुद्ध्यवज्ञानमपमानं च शाश्वतम् ||

अर्थ

अगदी बृहस्पति असला तरी वेळ आल्याशिवाय बोलला, तर तो बुद्धीचा कमीपणा समजला जातो आणि त्याचा खूप अपमान होतो.

Wednesday, November 23, 2011

५१०. जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता |

अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् |

अर्थ

चांगले कपडे घातलेला माणूस सभेवर छाप पाडतो. ज्याच्याकडे  गाई-म्हशी आहे त्याला हवं ते खाता येत. वाहन असणा-या माणसाने रस्त्यावर विजय मिळवलेला असतो [तो मनात येईल तिकडे जाऊ शकतो.]  चारित्र्य उत्तम असणाऱ्या माणसाने सगळच जिंकलेल असतं.

५०९. दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम् |

आवृणुध्वमतो दोषान् विवृणुध्वं गुणान् बुधा: ||

अर्थ

हे जाणकार लोकांनो; या जगात एकही गोष्ट [एकही] दोष नसलेली किंवा एक ही गुण नसलेली नसते म्हणून दोष झाका आणि गुणांच वर्णन करा [वाढवा] [सर्वच गोष्टीत काहीनाकाही दोष व काहीतरी गुण असतात तर आहे त्यातलं चांगल बघावं दोष उगाळत बसू नये.]

Monday, November 21, 2011

५०८. निस्स्वं त्यजन्ति गणिका अकल्पं नृपतिं प्रजा: |अधीतविद्या आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ||

खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् | दग्धं मृगास्तथारण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ||

अर्थ

कफल्लक माणसाचा वेश्या त्याग करतात; दुबळ्या राजाचा प्रजा त्याग करते; शिक्षण पूर्ण झाल्यावर [विद्यार्थी] गुरूला सोडून जातात; दक्षिणा मिळाल्यावर यज्ञाचे पुरोहित यजमानाला सोडून जातात; फळे नसलेलं झाड पक्षि सोडून जातात; जेवण झाल्यावर पाहुणे पळतात; प्राणी वणवा पेटलेल अरण्य सोडून जातात आणि जार उपभोग घेऊन बाईला टाकून जातो.

५०७. यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पद: |

तद्वदर्थान् मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ||

अर्थ

ज्याप्रमाणे फुलांना काहीही त्रास न देता भुंगा त्यामधील मध गोळा करतो त्याप्रमाणे [राजाने] प्रजेला त्रास न होईल अशा रीतीने कर घ्यावे.

५०६. किं वाच्यं सूर्यशाशिनो: दारिद्र्यं महतां पुर: |

दिनरात्रिविभागेन परिधत्तो यदम्बरम् ||

अर्थ

सूर्य आणि चन्द्र यांच्या दळीद्राबद्दल [अजून] काय सांगावे? थोरामोठ्यांच्या समोर दिवस आणि रात्र अस वाटणी करून घेऊन ते दोघ अंबर [ कपडा; आकाश ] वापरतात. [कविनी अम्बर या शब्दावर सुंदर श्लेष केला आहे.]

५०५. तन्तवोऽप्यायता नित्यं तन्तवो बहुला: समा: |

बहून्बहुत्वादायान्सहन्तीत्युपमा सताम् ||

अर्थ

धागे सूक्ष्म [पातळ, दुर्बल] आणि लांब असून [जर] ते खूप आणि एकाच दिशेने असले तर ते खूप झटके किंवा भार सहन करतात हाच सज्जनाच्या बाबतीत दृष्टांत आहे [सज्जन दुर्बल असताना जर दुसऱ्यांच्या बरोबर एकत्र येऊन काम केल तर अडचणींवर मात करून सफल होतात.]

५०४. लिम्पतीव तमोऽङ्गानि वर्षतीवाञ्जनं नभ: |

असत्पुरुषसेवेव दृष्टिर्विफलतां गता || मृच्छकटिक अंक पहिला

अर्थ

रात्रीच्या अंधाराचे विटाने केलेले वर्णन - सर्व शरीराला जणू काही अंधार फासला जातोय; आकाश जणू काही काजळाचा पाऊस पाडतय; दुष्ट माणसाची सेवा जशी वाया जाते त्याप्रमाणे दृष्टि निरुपयोगी झाली आहे.

Wednesday, November 16, 2011

५०३. शास्त्रानुसारिणी चर्या चित्तज्ञा: पार्श्ववर्तिन: |

बुद्धिरस्खलितार्थेषु परिपूर्णं रसायनम् ||

अर्थ

[आरोग्य] शास्त्राला अनुसरून आचरण; आजूबाजूची माणसे आपल मन जाणणारी; आपल्याला जे हवं असेल ते मिळवण्यासाठी [योग्य ते करण्याची] बुद्धि या गोष्टी म्हणजे उत्तम रसायन [पौष्टीक अन्न] आहेत.

Monday, November 14, 2011

५०२. अमृतं कल्पयित्वा तु यदन्नं समुपागतम् |

प्राणाग्निहोत्रविधिना भोज्यं तद्वदघापहम् ||

अर्थ

जे अन्न आपल्यापुढे वाढून आले असेल ते अमृत आहे अशी कल्पना करून प्राण हेच अग्निहोत्र आहे अशा रीतीने [यज्ञाप्रमाणे पावित्र्य राखून] तो जसा पापहरण करतो त्याप्रमाणे हे रोग हारक आहे असे समजून जेवावे.

५०१. अर्थानामर्जने दु:खमर्जितानां च रक्षणे |

आये दु:खं व्यये दु:खं धिगर्थान् कष्टसंश्रितान् ||

अर्थ

पैसे मिळवताना [माणूस कष्ट पडल्यामुळे] दु:खी होतो मिळवलेली संपत्ती [चोर; नातेवाईक; कररूपाने घेणारे या सगळ्यांपासून ] सांभाळण्याचा त्रास असतो मिळवण्यास दु:ख; खर्च करताना पण वाईट वाटत अशा फक्त त्रासच देणाऱ्या संपत्तीचा धिक्कार असो !

५००. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती |

पुष्पाञ्जलिरयं तस्यां रसिकेभ्यो प्रदीयते ||

अर्थ

सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा ही महत्वाची; मधुर देवांनी उपयोगात आणलेली भाषा आहे. तिच्यातील [वाङ्मयाच्या ] रसिकांना त्याच भाषेमध्ये [प्रेमाची; सुभाषित रूपी] पुष्पांजली वहात आहोत.

Friday, November 11, 2011

४९९. धनमस्तीति वाणिज्यं भूमिरस्तीति कर्षणम् |

सेवा न किञ्चिदस्तीति भिक्षा नैव च नैव च ||

अर्थ

[आपल्याकडे] संपत्ती असेल तर [उपजीविकेसाठी] व्यापार करावा; जमीन असेल तर शेती करावी; अस काही नसेल तर नोकरी करावी पण भीक कधीच मागू नये.

४९८. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् |

अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात्‌ चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ||

अर्थ

आपण [स्वतः; आपल मन] जर आनंदात असेल तर [सगळं] जग आनंदी आहे [असं आपल्याला वाटत] आपण दु:खी असलो तर सगळ जग दु:खी [भासत] म्हणून जर तुला सुख मिळवण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा मन समाधानी ठेवण्याचा प्रयत्न कर.

४९७. साहित्यसंगीतकलाविहीन: साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन: |

तृणं न खादन्नपि जीवमान: तद् भागधेयं परमं पशूनाम् ||

अर्थ

वाङ्मय; गानकला किंवा इतर दुसरी कोणतीही कला न येणारा [माणूस म्हणजे] शेपूट आणि शिंग नसलेला मूर्तिमंत पशूच होय तो जगतो [पण] गवत खात नाही हे पशूंचे अगदी सुदैवच म्हणायचे.

४९६. दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् |

सत्यपूतां वदेत् वाणीं मन:पूतं समाचरेत् ||

अर्थ = [पाय ठेवताना] नजरेने तपासून ठेवावा; पाणी कापडात गाळून प्यावं; बोलताना सत्याने पवित्र अशी वाणी बोलावी; मनाला [पटलं तर] पवित्र वाटेल असच वागावं [ खर तर चूक करत असताना आपलं मन खात असतं तसं झालं तर ति गोष्ट करू नये. मराठीत मात्र चवथा चरण आहे त्याचा अर्थ वाटेल तसे वागणे असा झाला आहे. मुळात संस्कृत श्लोकाचा तसा अर्थ नाही.]

४९५. ददाति प्रतिगृण्हाति गुह्यमाख्याति पृच्छति |

भुङ्क्ते भोजयते चैव षड् - विधं प्रीतिलक्षणम् ||

अर्थ

प्रेम व्यक्त सहा प्रकारांनी होते. [ज्याच्यावर जीव आहे त्याला काही] देणे; [त्याच्याकडून] घेणे; गुप्त गोष्ट विचारतो आणि [आपल्याबाबतची] सांगतो; [त्याच्याकडे] जेवतो आणि त्याला जेऊ घालतो हे प्रेम असल्याचे लक्षण आहे.

४९४. कुलीनै: सह संपर्कं पण्डितै: सह मित्रताम् |

ज्ञातिभिश्च समं मेलं कुर्वाणो नावसीदति ||

अर्थ

चांगल्या कुळातील माणसांबरोबर संबंध; विद्वानांशी मैत्री; आपल्या जातभाईशी येण-जाणं असणा-यांचा कधीच नाश होत नाही.

४९३. अनुगन्तुं सतां वर्त्म कृत्स्नं यदि न शक्यते |

स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ||

अर्थ

सज्जनांची वाट चोखाळणं [त्यांच पूर्णपणे अनुकरण करणं] जरी [आपल्याला] शक्य नसेल तरीही थोड का होईना [जेवढ जमेल तेवढ] अनुकरण करावं [तेवढ केल्यानी सुद्धा आपल्या उन्नतीला मदतच होते.] त्या रस्त्याने जाणा-यांचा अध:पात होत नाही.

Friday, November 4, 2011

४९२. अधोऽध: पश्यतः कस्य महिमा नोपजायते |

उपर्युपरि पश्यन्त: सर्व एव दारिद्रति ||

अर्थ

आपल्यापेक्षा खाली [ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे] बघत राहिलो तर आपण मोठे [चांगल्या स्थितीत ] आहोत असे वाटते. [पण ] वर वर पहात राहिल्यास [ आपल्यापेक्षा श्रीमंता कडे ] पहात राहिल्यास [माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्यापेक्षा अधिक श्रीमंत कोणीतरी असतोच त्यामुळे ] सर्वच गरीब आहेत असे वाटू शकते.

४९१. न कामयेऽहं गतिमीश्वारात् परामष्टर्द्धियुक्तामपुनर्भवं वा |

आर्तिं प्रपद्येऽखिलदेहभाजामन्त:स्थितो येन भवन्त्यदु:खा: || भागवत ९ स्कंध २१ वा अध्याय

रन्तिदेव राजाची परिक्षा घेण्यासाठी ब्रह्मा; विष्णु महेश येतात. खूप दिवसाचा तो उपाशी असताना, [४८ दिवस तो उपाशी आहे] अन्न मिळाल्यावर एक ब्राह्मण येतो. तो खाऊन गेल्यावर, एक वृषल येतो. उरलेल्या मधून तो त्याला अन्न देतो. मग एक हरिजन कुत्री घेऊन येतो. मग पाणीच फक्त उरत ते अंत्यजाला देऊन रन्तिदेव हा श्लोक म्हणतो.

अर्थ

मी परमेश्वराकडे स्वर्गात ऎश्वर्यसंपन्न असे स्थान मिळवण्याची इच्छा किंवा मोक्ष सुद्धा मागत नाही. प्राणिमात्राच्या देहात वास करणाऱ्या आत्म्याचे दु:ख नाहीसे व्हावे म्हणून मी त्याला शरण जातो.

Tuesday, November 1, 2011

४९०. न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् |

कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ||

अर्थ

मी राजा बनण्याची इच्छा करीत नाही. मला स्वर्ग सुद्धा नको, [एवढेच काय तर] मोक्ष सुद्धा नको. दु:खाने होरपळलेल्या प्राण्यांचे संकट नाहीस व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

४८९. गच्छत: स्खलनं क्वापि भवत्येव प्रमादत: |

हसन्ति दुर्जनास्तत्र समादधति साधव: ||

अर्थ

चालायला [सुरवात केल्यावर - नवीन काही शिक्षण; उपक्रम राबवताना] चुकून कुठेतरी [माणूस] घसरतो - प्रगती न होता काहीतरी घोटाळा होऊ शकतो - अशा वेळी दुष्ट माणसे थट्टा करतात [पण] सज्जन [मात्र त्याला] सांभाळून घेतात.

Monday, October 31, 2011

४८८. यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम् |

'स्व ' जन: 'श्व 'जन: मा भूत् 'सकलं ' ' शकलं '; ' सकृत् ' 'शकृत्' ||

अर्थ

हे बाळ; जरी तू पुष्कळ शिकला नाहीस [तरी चालेल] पण व्याकरण मात्र शिक. [निदान] स्वजन [आपले नातेवाईक च्याऐवजी ] श्वजन [कुत्रा]; सकल [च्याठिकाणी] शकल [तुकडा] सकृत् [च्यासाठी] शकृत् [शेण] असे अर्थ व्हायला नकोत.

Friday, October 28, 2011

४८७. अज्ञ: सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञ: |

ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति ||

अर्थ

अडाणी माणसाची समजूत सहजपणे पटते; जाणकाराचे समाधान त्यापेक्षा लवकर करता येते. पण किंचितशा ज्ञानाने गर्विष्ठ बनलेल्या माणसाचे समाधान ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाही.

४८६. स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञताया: |

विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम् ||

अर्थ

ब्रह्मदेवाने मूर्ख लोकांसाठी अज्ञानाचे [मूर्खपणाचे केवळ] स्वतःच्याच ताब्यात असणारे; सर्व फायदेच असणारे [काहीच तोटा होत नाही असे] पांघरूण - म्हणजेच मौन - बनवले आहे विशेषतः ज्ञानी लोकांच्या समुदायात गप्प बसणे हा मूर्ख लोकांसाठी सुंदर दागिना आहे.

४८५. अपारे काव्यसंसारे कविरेक: प्रजापति: |

यथास्मै रोचते यद्वत्तथा तथा वै परिवर्तते ||

अर्थ

अमर्याद अशा काव्यसृष्टी मध्ये कवि हा एकटाच ब्रह्मदेव [कर्ता- करविता] असतो. ते [जग] त्याला जसं आवडत तसं ते फिरत [काव्यात्म न्याय सामान्यतः वाङ्मयात वापरलेला असतो या जगातल्या प्रमाणे चांगल्या माणसांचे हाल कवि होउ देत नाहीत. कपट करणा-राला शिक्षा मिळते.]

४८४. शरीरस्य गुणानां च दूरमत्यन्तमन्तरम् |

शरीरं क्षणविध्वंसि ; कल्पान्तस्थायिनो गुणा: ||

अर्थ

[आपला] देह आणि गुण यात अतिशय मोठ अंतर आहे. शरीर हे क्षणात नष्ट होऊन जातं. पण गुण मात्र कल्प एवढा काल टिकतात. [थोड्याशा फायद्यासाठी उच्च तत्व सोडून देऊन आपला सुसंस्कृतपणा नाहीसा करू नये. आज नाही उद्या आपण मरणारच आहोत.]

४८३. अम्भस: परिमाणेन प्रोन्नतं कमलं भवेत् |

स्वस्वामिना बलवता भृत्यो भवति गर्वित: ||

अर्थ

पाण्याच्या प्रमाणा प्रमाणे [पाण्याची पातळी जेवढी वर असेल तेवढ] कमळ अधिक उंचीवर [तरंगत]. स्वतःचा मालक बलाढ्य झाला कि नोकराला [त्याप्रमाणात] माज चढतो. [तो मालकाच्या कर्तृत्वावर असतो.]

४८२. कवय: परितुष्यन्ति नैवान्ये कविसूक्तिभि: |

न हि सागरवत् कूपा वर्धन्ते विधुकान्तिभि: ||

अर्थ

कवीच्या चांगल्या वचनांनी [कवनांनी, दुसरे] कवि आनंदित होतात, इतर [सामान्य लोक] नाही. [असे पहा कि] चंद्राच्या चांदण्याने समुद्राप्रमाणे विहिरींना भरती येत नाही. [कविनांच - तेवढ ज्ञान - रसिकता असेल तरच त्याच सौंदर्य ग्रहण करता येत.]

४८१. सर्वत्र देशे गुणवान् शोभते प्रथितो नर: |

मणि: शीर्षे गले बाहौ यत्र कुत्रापि शोभते ||

अर्थ

गुणी मनुष्य देशात कुठल्याही भागात [किंवा कुठल्याही विषयात जाणकार असला तरी] तो प्रसिद्ध होतो आणि शोभून दिसतो. रत्न डोक्यावर [मुकुटात] गळ्यात [हारात] दंडावर [वाक्यामध्ये] कुठेही घातलं तरी त्याचं सगळीकडे तेज पसरत.

४८०. केनामृतमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् |

आपदां च परित्राणं शोकसन्तापभेषजम् ||

अर्थ

कोणी बरं दोनच अक्षरे असलेले अमृत निर्माण केल असावं. अगदी कुठल्याही दु:खावर औषध आहे आणि संकटापासून ज्याच्यामुळे संरक्षण मिळत. [तो म्हणजे मित्र]

Thursday, October 20, 2011

४७९. यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य |

एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति ||

अर्थ

ज्याप्रमाणे चंदनाचे [लाकडांचे] ओझे वाहून नेणारे गाढव ओझे जाणते, पण चंदन [त्याचा सुगंध] जाणत नाही. त्याचप्रमाणे पुष्कळ शास्त्रांचा अभ्यास करूनही मूर्ख माणसे त्यांच्या अर्थाच्या अज्ञानामुळे फक्त ओझेच वाहतात [कष्ट तेवढे करतात, ज्ञानाचा आनंद त्यांना मिळत नाही.]

Wednesday, October 19, 2011

४७८. "रात्रिर्गमिष्यति ; भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति; हसिष्यति पङ्कजश्री: |

इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार ||   

अर्थ

[कमळ मिटल्यामुळे] कळ्यामधे अडकलेला भुंगा असा विचार करत असतो; " रात्र संपेल; सुंदर पहाट येईल; सूर्य उगवेल; कमळ दिमाखात उमलेल [आणि आपण बाहेर पडू] एवढ्यात अरेरे ! [दुर्दैवाने] हत्तीने कमळवेलच उपटली.

Tuesday, October 18, 2011

४७७. बन्धनानि किल सन्ति बहूनि ; प्रेमरज्जुमयबन्धनमाहु: |

दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजकोषे ||

अर्थ

बंधन तर बरीच [बऱ्याच प्रकारची] असतात. पण प्रेमाच्या धाग्यांच बन्धन [तोडण्यास सर्वात कठीण] असे सांगतात. [असे पहा कि] लाकडे पोखारण्यात निष्णात अश्या भुंग्याला देखील [अतिशय कोमल असूनही] कमळाच्या पाकळ्या [कुरतडून बाहेर पडण्यास असमर्थ ठरतो] निष्क्रीय बनवतात. [भुंगा मध खायला गेल्यावर सूर्यास्त झाला तर कमळ मिटत आणि तो आत अडकतो.]

४७६. दुन्दुभिस्तु सुतरामचेतनस्तन्मुखादपि धनं धनं धनम् |

इत्थमेव निनद: प्रवर्तते किं पुन: यदि जन: सचेतन: ||

अर्थ

नगारा ही वस्तू तर पूर्णपणे जड [चेतनेचा अंश जरा सुद्धा नसलेली] तरीसुद्धा तिच्या मुखातून सुद्धा धन -धन -धन असा आवाज येत राहतो. तर सजीव माणूस [सतत धन - पैसे पैसे] करतील [यात काय संशय?]

४७५. लङ्कापते: संकुचितं यशो यत् यत्कीर्तिपात्रं रघुराजपुत्र: |

स सर्व एवादिकवे: प्रभावो न कोपनिया: कवय: क्षितीन्द्रै: ||

अर्थ

लंकेच्या राजा रावणाची कीर्ति [जी] कमी झाली आणि श्री रामाची कीर्ति [जगभर] प्रसिद्ध झाली ही सर्व आद्य कवि [वाल्मिकी] यांची करामत आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी कवी रागवतील असे वागू नये [कवि नर्म विनोदाने आपले महात्म्य सांगत आहे.]

४७४. एते सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता स्वार्थाविरोधेन ये |

तेऽमी मानुषराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये , ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ||

अर्थ

स्वतःच्या फायद्याचा त्याग करून दुसऱ्यांची कामे करतात ते सज्जन. स्वतःच्या मतलबाला धक्का न लावता [जेवढी जमेल तेवढी] मदत दुसऱ्यासाठी करतात त्यांना सामान्य लोक म्हणावे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच नुकसान करता ते मनुष्य रूपी राक्षसच होत. [पण स्वतःचा काही फायदा सुद्धा नसताना] विनाकारणच दुसऱ्यांच नुकसान करणारांना काय म्हणावं ते आम्हाला [सुद्धा] समजत नाही.

Friday, October 14, 2011

४७३. यज्ञोत्सवे स्वपित्रा हठादनाकारिता सती गत्वा |

तनुमजहात्परिभूता क्वापि न गच्छेदनाहूत: || शतोपदेशप्रबन्ध गुमानि कवि

अर्थ

स्वतःच्या वडिलांनी यज्ञासाठी आमंत्रण दिलेले नसता हट्टाने [माहेरच्या प्रेमामुळे] सती तेथे गेल्यावर अपमान झाल्यामुळे सतीने प्राणत्याग केला. [म्हणून] आमंत्रण असल्याशिवाय कुठेही [अगदी जवळच्या नातलगांकडे सुद्धा] जाऊ नये.

४७२. न विना परिवादेन रमते दुर्जनो जन: |

काक: सर्वरसान्पीत्वा विनामेध्यं न तृप्यति ||

अर्थ

कुटाळक्या केल्याशिवाय दुष्टांना आनंद होत नाही.  कावळ्याला जरी सर्व चवदार पदार्थ मिळाले तरी निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.

Wednesday, October 12, 2011

४७१. सुजना: परोपकारं शूरा: शस्त्रं धनं कृपणा: |

कुलवत्यो मन्दाक्षं प्राणवियोगेऽपि नैव मुञ्चति ||

अर्थ

जीव जाण्याचा प्रसंग आला तरी सज्जन लोक दुसऱ्यावर उपकार करणे; शूरवीर शस्त्र [घेऊन पराक्रम] करणे; चिक्कू माणसे संपत्ती आणि घरंदाज स्त्रिया लज्जा सोडत नाहीत.

४७०. युक्तं सभायां खलु मर्कटानां शाखास्तरूणां मृदुलासनानि |

सुभाषितं चीत्कृतिरातिथेयी दन्तैर्नखाग्रैश्च विपाटनानि ||

अर्थ

माकडांची सभा असेल तर झाडांच्या [वेड्यावाकड्या] फांद्या म्हणजेच मउसूत बैठका; सभेतली सुंदर भाषण म्हणजे त्यांचे चीत्कार आणि नखांनी आणि दातांनी ओरबाडणे हाच पाहुणचार मिळणार.

४६९. यदसत्यं वदेन्मर्त्यो यद्वासेव्यं च सेवते |

यद् गच्छति विदेशं च तत्सर्वमुदरार्थत: ||

अर्थ

माणूस जे खोट बोलतो; नको त्याची नोकरी करतो [किवा नाईलाजाने नको ते भोगतो] परदेशी जातो ते सगळं पोटासाठी.

४६८. दुराचारो हि पुरुषो लोके भवति निन्दित: |

दु:खभागी च सततं व्याधितोऽल्पायुरेव च ||

अर्थ

वाईट आचरणाचा माणसाची जगभर निंदा होते. तो नेहमी दु:खी; आजारी आणि अल्पायुषी असतो.

४६७. अगतित्वमतिश्रद्धा ज्ञानाभासेन तृप्तता |

त्रय: शिष्यगुणा ह्येते मूर्खाचार्यस्य भाग्यत: ||

अर्थ

मूर्ख शिक्षक [जर] नशीबवान असेल तर [अभ्यासाच्या विषयात] बेताचि अक्कल; [शिक्षकावर नको इतका] विश्वास आणि वरवरच्या ज्ञानाने समाधान होणे असे तीन गुण? शिष्यामध्ये त्याला मिळतात.

४६६. मात्रा समं नास्ति शरीरपोषणं चिन्तासमं नास्ति शरीरशोषणम् |

मित्रं विना नास्ति शरीरतोषणं विद्यां विना नास्ति शरीरभूषणम् ||

अर्थ

आई सारखं [मुलाच्या] शरीराची वाढ होण्यासाठी दुसर [कोणी करत] नाही. काळजी सारखं शरीर पोखरणार दुसर काही नसतं. मित्रासारख दुसरं कोणी आनंद देणार नसतं शिक्षणासारखा शरीरासाठी दुसरा अलंकार नाही.

Tuesday, October 4, 2011

४६५. सर्वथा संत्यजेद्वादं न कंचिन्मर्मणि स्पृशेत् |

सर्वान् परित्यजेदर्थान् स्वाध्यायस्य विरोधिन: ||

अर्थ

[विद्यार्थ्याने] वादावादी संपूर्णपणे टाळावी; कोणालाही [जीवाला] लागेल असे बोलू नये; अभ्यासाला मारक ठरतील अशा सर्व गोष्टी सोडून द्याव्यात.

४६४. यदेवोपनतं दु:खात्सुखं तद्रसवत्तरम् |

निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः ||

अर्थ

दु:खानंतर उपभोगायला मिळालेलं सुख हे अधिक बहारदार वाटतं. उन्हातून तापुन आल्यावर झाडाची सावली जास्त आनंददायी असते.

४६३. या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना |

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभि: देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ||

अर्थ

[बुद्धीचा ] मंदपणा संपूर्णपणे नाहीसा करणारी; ऐश्वर्यसंपन्न अशी; कुन्दाची फुलं, चन्द्र, तुषारांचा हार यांच्याप्रमाणे [नाजूक, तेजस्वी, गोरीपान] असणारी; शुभ्र वस्त्रे धारण करणारी; जिचा हात श्रेष्ठ अशा वीणेच्या दांड्याने सुशोभित झाला आहे अशी; पांढऱ्या कमळावर बसणारी; ब्रह्मा, विष्णु, महेश वगैरे देव जिला नेहमी नमस्कार करतात अशी देवी सरस्वती माझे रक्षण करो.

Wednesday, September 28, 2011

४६२. भक्ष्योत्तमप्रतिछन्नं मत्स्यो बडिशमायसम् |

लोभाभिपाती ग्रासते नानुबन्धमवेक्षते ||

अर्थ

हावरटपणाने मासा उत्तम प्रकारच्या खाद्याने चांगल्या प्रकारे झाकलेला लोखंडाचा गळ पकडतो; परिणामाचा विचार करत नाही [ त्या हावरटपणाचा परिणाम म्हणून त्याला प्राण गमवावे लागतात म्हणून कोणतही काम करण्या आधी परिणामाचा विचार करावा.]

४६१. प्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मन: |

किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति ||

अर्थ

मी आचरण करतो त्यापैकी काय जनावराच्या सारखं आहे आणि काय सज्जनासारखे आहे असं माणसांनी रोज आत्मपरिक्षण केले पाहिजे. [म्हणजे योग्य ती सुधारणा करता येईल ]

४६०. भोजनान्तेऽमृतं तक्रं स्वापादौ दुग्धममृतम् |

निशान्ते चामृतं वारि सर्वदैवामृतं मधु ||

अर्थ

जेवणाच्या शेवटी ताक पिणं हे अमृतासारखं [तब्बेतीला चांगलं] असतं. झोपण्यापूर्वी दूध पीण चांगले. रात्र संपल्यावर [पहाटे] पाणी पीण अमृतासारखं असतं आणि मध नेहमीच [तब्बेतीला चांगला असतो.]

४५९. भद्र सूकर; गच्छ त्वं ; ब्रूहि सिंहो मया जित: |

पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम् ||

अर्थ

हे भल्या डुकरा; तू [खुशाल] जा [आणि सगळ्या जगाला] सांग की मी सिंहाला जिंकलं आहे. सिंह आणि डुक्कर या दोघांचे सामर्थ्य विद्वानांना [नक्कीच] ठाऊक असते. [अन्योक्ती अलंकाराचे हे सुंदर उदाहरण आहे जेंव्हा एखाद्याची स्तुती किंवा निंदा करायची असेल तेंव्हा सरळ त्याच्या बद्दल न बोलता दुसऱ्याशीच बोलून त्या भावना व्यक्त केलेल्या असतात तेंव्हा अन्योक्ती हा अलंकार होतो.]

४५८. अनुबन्धमवेक्षेत सर्वकार्येषु सर्वदा |

संप्रधार्य च कुर्वीत; सहसा न समाचरेत् ||

अर्थ

नेहमी सगळ्याच कामांच्या बाबतीत परिणामांचा नीट विचार करून मगच कुठलही काम करावं. अचानक [काही विचार न करता] करू नये.

४५७. या लोभात् या परद्रोहात् य: पात्रे य: परार्थके |

प्रीति: लक्ष्मी: व्यय: क्लेश: सा किं सा किं स किं स किम् ||

अर्थ

जे प्रेम लोभातून केलेलं असतं त्याचा काय बरं उपयोग? दुसऱ्याचा द्वेष करून मिळवलेल्या संपत्तीचा काय बर उपयोग? जो खर्च योग्य ठिकाणी [लायक व्यक्ती साठी] केला असेल त्याचं [दु:ख ] करण्याचं काही कारण नाही. दुसऱ्यासाठी त्रास करून घेतला तर त्याचा काय बरं उपयोग? [यथासांख्य अलंकाराच हे सुंदर उदाहरण आहे.]

Thursday, September 22, 2011

४५६. शुभं वाप्यशुभं वा स्यात्‌ ; द्वेष्यं वा यदि वा प्रियम् |

अपृष्टोऽपि वदेत्सत्यं यस्य नेच्छेत् पराजयम् ||महाभारत ; विदुरनीति

अर्थ

ज्याचा पराभव [तोटा; अपमान ] होऊ नये अशी आपली इच्छा असेल; त्याने विचारले नाही तरी; आपण सांगत असलेली गोष्ट जरी [तुझं] चांगले होईल किंवा वाईट होईल असं सांगाव लागत असलं तरी; [त्याला] आवडत असेल किंवा राग येत असेल तरी सुद्धा खरं असेल तसच सांगून टाकावे.

४५५. उपकारिषु य: साधु: साधुत्वे तस्य को गुण: |

अपकारिषु य: साधु: स साधु; सद्भिरुच्यते ||

अर्थ

आपल्यावर उपकार करणा-यांशी जो चांगला वागतो त्यात त्याचा चांगुलपणा तो काय? [हा तर व्यवहार आहे] आपल्याला त्रास देणाराशीही जो चांगला वागतो [त्याला मदत करतो] त्याची सज्जन लोक सज्जन अशी [प्रशंसा ] करतात.

Tuesday, September 20, 2011

४५४. किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते? किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण |

मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेण? किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण ||

अर्थ

वसंत ऋतु संपल्यावर कोकिळेच्या ओरडण्याचा काय बरं उपयोग? [वसंत ऋतु मध्येच कोकीलाचा आवाज सुरेल येतो. नंतर फारसा चांगला नसतो.] भित्र्या माणसाजवळ खूप शस्त्रे असून काय उपयोग? [तो ती वापरत नाही] संकटाच्यावेळी निघून जाणाऱ्या मित्राचा काय बरं उपयोग? अशिक्षित माणसाच जगणं तसच निरर्थक असत.

४५३. अपां निधिं वारिभिरर्चयन्ति दीपेन सूर्यं प्रतिबोधयन्ति |

ताभ्यां तयोः किं परिपूर्णता स्यात्‌ भक्त्या हि तुष्यन्ति महानुभावा: ||

अर्थ

पाण्याचा [फार मोठा] साठा असणाऱ्या [समुद्राला] पाण्याने [अर्घ्य सोडून] त्याची पूजा करतात. [तेजाचा केवळ पुंज असणाऱ्या] सूर्याला दिवा ओवाळून त्याची पूजा करतात. [मुळातच त्या पदार्थांचा खजिना असणाऱ्या त्याच गोष्टी दिल्यामुळे त्यांच्यात काय वाढ होणार आहे? [त्यासाठी अर्घ्य किंवा ओवाळणं नसतच ] थोर लोक त्यांना दाखवलेल्या भक्तीनेच प्रसन्न होतात.

४५२. अभ्रच्छाया खलप्रीति: समुद्रान्ते च मेदिनी |

अल्पेनैव विनश्यन्ति यौवनानि धनानि च ||

अर्थ

[आकाशातील] ढगांची रचना; दुष्ट माणसाचं प्रेम; समुद्र किनाऱ्यावरची जमीन; तारुण्य आणि [फार मोठ्या प्रमाणात असूनही] संपत्ती झटक्यात नष्ट होऊ शकतात.

४५१. यद्वञ्चनाहितमतिर्बहुचाटुगर्भं कार्योन्मुख: खलजन: कृतकं ब्रवीति |

तत्साधवो न न विदन्ति ; विदन्ति किन्तु कर्तुं वृथा प्रणयमस्य न पारयन्ति ||

अर्थ

फसवण्याची बुद्धी धरून कुठलं तरी आपलं काम करवून घेण्यासाठी दुष्ट मनुष्य जे खोटं असं अतिशय गोड बोलतो ते सज्जनांना समाजात नाही असे नाही. त्यातला खोटारडेपणा त्यांना समजतो. पण [आपल्याला त्याने केलेली] विनंती वाया जाऊ देणं त्यांना बरं वाटत नाही. [दुष्ट माणसाचा खोटारडेपणा समजूनही ते त्याला मदत करतात.]

Thursday, September 15, 2011

४५०. श्रद्दधान: शुभां विद्यामाददीतावरादपि |

अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम् ||

अर्थ

श्रद्धाळू माणसाने कल्याणकारक विद्या जरी हीन माणसाकडे असली तरी शिकून घ्यावी. आपल्या शत्रूकडून सुद्धा चांगला गुण असेल तर शिकून घ्यावा. शहाण वचन असलं तर लहान मूल बोलल असलं तरी विचारात घ्यावं.

४४९. सुखमर्थो भवेत्‌ दातुं सुखं प्राणा: सुखं तप: |

सुखमन्यत् भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम् || स्वप्न - वासवदत्त ; भास

अर्थ

पैशाचं दान करण सोप आहे. प्राण देणसुद्धा सुखानी जमेल. पुण्य सुद्धा दान करता येईल. इतर काहीही सुखाने दान करता येईल. [पण दुसऱ्याची] ठेव सांभाळण फार कठीण असतं.

४४८. वाच्यतां समयोऽतीत: स्पष्टमग्रे भविष्यति |

इति पाठयतां पाठे काठिन्यं कुत्र वर्तते ?

अर्थ

"वाचा; वाचा [तुम्ही स्वतः वाचल्याशिवाय समजणार नाही]; आता वेळ संपला; [हे ना] पुढे नीट कळेल" आशा प्रकारे शिकवणाराना धड्यात अवघड ते काय असणार ?

४४७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनै: सज्जनैरपि |

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: ||

अर्थ

[एकाच वेळेला] खूप जणांशी विरोध करू नये. ते सज्जन असूत का दुर्जन [पण एकाच वेळी खूप लोकांशी भांडल्यामुळे आपला पराभवच होईल.] अगदी सळसळता नागराज असला तरी [अगदी क्षुद्र असूनही संख्या मोठी असल्यामुळे] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

४४६. काव्यस्फूर्ति: कवीन्द्रस्य गायकस्य तथा स्वर : |

रोदनं बालकस्यापि कालं पश्यन्ति न क्वचित् ||

अर्थ

गायकाचा आवाज श्रेष्ठ; कवीच्या प्रतिभेचा उन्मेष आणि लहान मुलाच रडणं काळवेळाच भान ठेवत नाहीत.

४४५. कर्णामृतं सूक्तिरसं विमुच्य दोषेषु यत्नः सुमहान् खलस्य |

अवेक्षते केलिवनं प्रविष्टः क्रमेलक: कण्टकजालमेव ||

अर्थ

दुष्ट माणूस अमृताप्रमाणे असणारी चांगली वचने सोडून देऊन दोष शोधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतो. उंट केळीच्या बागेत गेला तरी काटेच शोधत राहतो.

४४४. एह्यागच्छ गृहाणमासनमिदं कस्माच्चिरात् दृश्यसे? का वार्ता? ह्यतिदुर्बलोऽसि कुशलं प्रीतोऽस्मि ते दर्शनात् |

एवं ये समुपागतान्प्रणयिन: प्रल्हादयन्त्यादरात् तेषां युक्तमशङ्कितेन मनसा हर्म्याणि गन्तुं सदा ||

अर्थ

"या; या; ह्या आसनावर बसा; किती दिवसांनी भेटलात! [तुमच्याकडची] काय बातमी? किती खराब झालात [सगळं] खुशाल आहे ना? तुमच्या भेटीमुळे [मला फार] आनंद झाला" अशाप्रकारे प्रेमळ असे जे लोक पाहुण्यांना आनंदित करतात त्यांच्या घरी नेहमी निर्धास्तपणे जाणे चांगल [कंटाळा करणाऱ्याकडे जाऊ नये.]

४४३. एहि गच्छ पतोत्तिष्ठ वद मौनं समाचर |

एवमाशाग्रहग्रस्तैः क्रीडन्ति धनिनोऽर्थिभिः ||

अर्थ

"ये रे; [नको] जा; पड; उभा रहा; बोल; [नको बोलूस] गप्प बस" अशाप्रकारे श्रीमंत लोक आशा रूपी भुताने पछाडलेल्या याचकांशी खेळ करतात.

४४२. तावद्भयाद् हि भेतव्यं यावद्भयमनागतम् |

आगतं तु भयं वीक्ष्य प्रहर्तव्यमभीतवत् ||

अर्थ

जो पर्यंत भीतीदायक परिस्थिती आली नाही तोपर्यंतच आपण घाबरावं. पण तशी परिस्थिती आल्यावर अगदी न भीता उलट प्रतिकार करावा.

४४१. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: |

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ||

अर्थ

गुरु हा ब्रह्मा; विष्णु: महेश या देवांचे रूपच असतो. तो मुर्तीमंत परब्रह्मच होय. अशा प्रकारच्या गुरुंना माझा नमस्कार असो.

४४०. भक्तापराधमन्त: स्थापयितुं स्थूलमस्ति यज्जठरम् |

श्रोतुं दु;खं कर्णौ यस्य च शूर्पाकृती नमस्तस्मै || कवि मुकुंदराय

अर्थ

भक्तांचे अपराध सामावून घेण्यासाठी ज्याचे पोट विशाल आहे अशा; भक्तांची दु:खे ऐकून घेण्यासाठी ज्याचे कान सुपासारखे मोठे अशा [देवा गजाननाला] माझा नमस्कार असो.

Wednesday, August 31, 2011

४३९. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् |

लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण: किं करिष्यति ||

अर्थ

ज्याला मूळचीच अक्कल म्हणजे विचारशक्ती नाही त्याला शास्त्राभ्यासाचा काय उपयोग? ज्याला डोळे नसतील त्याला आरशात काय दिसणार कपाळ?

४३८. अरावप्युचितं कार्यमातिथ्यं गृहमागते |

छेत्तुः पार्श्वगतां छायां नोपसंहरते द्रुमः ||

अर्थ

शत्रु जरी असला तरी आपल्या घरी आल्यावर [सज्जन] त्याचा चांगला पाहुणचार करतात - त्याच भलंच करतात. झाड तोडायला आलेल्या सुद्धा झाड आपल्या सावलीत सामावून घेत. सावली आखडून घेत नाही.

४३७. विगतघननिशीथे प्रातरुत्थाय नित्यं पिबति खलु नरो यो घ्राणरन्ध्रेण वारि |

स भवति मतिपूर्णश्चक्षुषा तार्क्ष्यतुल्यो वलिपलितविहीन: सर्वरोगैर्विमुक्त: ||

अर्थ

मध्यरात्र उलटून गेल्यावर - भल्या पहाटे - उठून जो मनुष्य नाकाने पाणी पितो तो बुद्धिमान; गरुडासारख्या दृष्टीचा तसेच अंगाला सुरकुत्या; डोक्याला टक्कल पडणे इत्यादी न होता सर्व रोगापासून मुक्त होतो.

Tuesday, August 23, 2011

४३६. गुणिनि गुणज्ञो रमते; नागुणशीलस्य गुणिनि परितोष: |

अलिरेति वनात्पद्मं ; न दर्दुरस्त्वेकवासोऽपि ||

अर्थ

गुणी माणसालाच गुणवंताबद्दल प्रेम; आस्था असते. जो स्वतः गुणी नसतो त्याला त्यांच्याबद्दल आदर नसतो. भुंगा लांबून - वनातून - कमळाकडे धावत येतो. पण बेडूक त्याच जलाशयात राहत असून हि कधी कमळाच्या जवळपासहि फिरकत नाही.

४३५. पात्रविशेषे न्यस्तं गुणान्तरं व्रजति शिल्पमाधातु: |

जलमिव समुद्रशुक्तौ मुक्ताफलतां पयोदस्य ||

अर्थ

गुरूने विशेष चांगल्या - सत्पात्र - व्यक्तीला एखादा विशेष गुण - कला; ज्ञान - दिल्यावर त्याचे सुंदर शिल्प तयार होते. जसे मेघाचे पाणी सर्वत्र पडते पण तेच समुद्रातील शिम्पेत पडले की त्याचे मोत्यात रुपांतर होते.

४३४. दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते |

व्यायामदृढगात्रस्य व्याधीर्नास्ति कदाचन ||

अर्थ

व्यायामामुळे शारीरिक दोष नाहीसे होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. [त्यामुळे सपाटून भूक लागते व अन्न पचते.] तसेच सर्व अवयव बळकट झाल्यामुळे रोग कधीही होत नाहीत.

४३३. सर्पाणां च खलानां च सर्वेषां दुष्टचेतसाम् |

अभिप्राया न सिध्यन्ति तेनेदं वर्तते जगत् ||

अर्थ

सापांचे; दुष्टांचे आणि सगळ्या हीन प्रवृत्तीच्या लोकांचे सगळे मनोरथ पूर्ण होत नाहीत, म्हणून तर हे जग चाललंय. [नाहीतर केव्हाच त्याचं वाटोळं झाल असतं]

४३२. खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |

उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

अर्थ

दुष्ट माणसे आणि काटे यांच्या बाबतीत दोनच प्रकारे वागता येते. एक तर पायताणाने त्यांचे थोबाड फोडणे किंवा त्यांना सदैव दुरूनच टाळणे.

Thursday, August 18, 2011

४३१. अम्ब; श्राम्यसि तिष्ठ; गोरसमहं मथ्नामि; मन्थानकं प्रालम्ब्य स्थितमीश्वरं सरभसं दीनाननो वासुकि: |

सासूयं कमलालया, सुरगण: सानन्दमुद्यद्भयं राहु: प्रैक्षत यं; स वोऽस्तु शिवदो गोपालबालो हरि: ||

अर्थ

" आई ; तू दमलीस ; थांब जराशी . मी दही घुसळतो " असं म्हणून मोठ्या आवेशाने उभा राहिलेला भगवान श्रीकृष्णला पाहून " आता पुन्हा आपल अंग सोलून निघणार " म्हणून वासुकि नाग व्याकुळ होऊन ; " या मंथनातून अजून एखादी लक्ष्मी तर निघणार नाही ना ?" अशा असूयेने भीतीग्रस्त लक्ष्मी; देव " आता यातून अनेक रत्ने आणि अमृत निघेल " म्हणून आनंदाने; तर उरलेलं हे मस्तक तरी या वेळी धड राहील ना म्हणून घाबरून राहू ज्याच्याकडे पाहू लागला तो गोपालबालक श्रीहरी तुम्हाला कल्याणकारक होवो.

४३०. रत्नाकरधौतपादां हिमालयकिरीटिनीम् |

ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्‌ ||

अर्थ

रत्नांची खाण असणारा [सागर] जिचे चरणप्रक्षालन करत आहे अशा; हिमालय हाच मुगुट धारण करणाऱ्या; जिच्यामध्ये थोर असे तत्वज्ञानी आणि शासनकर्ते जन्माला आले आहेत अशा भारतमातेला मी नमस्कार करते.

१५ ऑगस्ट्च्या निमित्ताने.


४२९. नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुन: पुच्छम् |

तद्वत्खलजनहृदयं बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||

अर्थ

कुत्र्याच शेपूट जरी [वर्षानुवर्ष] नळीत घालून ठेवलं तरी ते [थोडसुद्धा ] सरळ होत नाही. [वाकड ते वाकडंच राहत] दुर्जनाच हृदय सुद्धा अगदी तस्सच असत त्याला कोणीही कितीही उपदेंश केला तरी ते प्रेमळ होणार नाहीच नाही.

४२८. क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं धनक्षये दीप्यति जाठराग्निः |

आपत्सु वैराणि समुल्लसन्ति छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति || पञ्चतन्त्र

अर्थ

जखम झाली की तिच्यावरच सारखे धक्के ठेचा लागतात; दारिद्र्य असले की भूक वाढते. संकटात असताना भांडणे उपटतात. एखादे छिद्र निर्माण झाले की त्यातून अनेक अनर्थ निर्माण होतात; वाढतच राहतात.

४२७. अन्यस्माल्लब्धपदो प्रायो नीचोऽपि दुस्सहो भवति |

रविरपि न दहति तादृग्यादृग्दहति वालुकानिकरः ||

अर्थ

दुसऱ्याकडून अधिकारपद मिळालेला नीच मनुष्य बहुधा अतिशय त्रासदायक ठरतो. अधिकारपद देणारा सुद्धा एवढा त्रासदायक नसतो. सूर्याचे उन जितके तापदायक असते त्याहून कितीतरीपट उन्हाने तापलेली वाळू भाजणारी ठरते.

Tuesday, August 9, 2011

४२६. निद्राप्रियो य: खलु कुम्भकर्णो हत: समीके स रघूत्तमेन |

वैधव्यमापद्यत तस्य कान्ता; श्रोतुं समायाति कथां पुराणम् ||

अर्थ = झोप लाडकी असलेल्या कुम्भकर्णाला रामाने युद्धात मारले. मग विधवा झालेली त्याची ती प्रिया - बिचारी झोप - कथा पुराणाला जाऊ लागली. [ पुराण ऐकणाऱ्या श्रोत्यांना बऱ्याचदा डुलक्या येतात.]

४२५. तस्करेभ्यो नियुक्तेभ्य: शत्रुभ्यो नृपवल्लभात् |

नृपतिर्निजलोभाच्च प्रजा रक्षेत्पितेव हि ||

अर्थ

राजाने चोरांपासून; आपल्या सेवकांपासून; मर्जीतल्या लोकांपासून; एवढेच काय स्वतःच्या लोभापासुनही प्रजेचे पितृवत् पालन करावे.

४२४. कर्तव्य: भ्रातृषु स्नेह: विस्मर्तव्या: गुणेतरा: |

सम्बधो बन्धुभि: श्रेयान् लोकयोरुभयोरपि || महाकवी भास ; श्रीकृष्ण

अर्थ

दोन्ही लोकात [इह आणि पर] नातेवाईकांशी [चांगले] संबध असणे अधिक चांगले असते. [म्हणून ] त्यांचे दोष विसरावे आणि त्यांच्यावर प्रेम करावे.

Saturday, August 6, 2011

४२३. उद्योगिन: करालम्बं करोति कमलालया |

अनुद्योगिकरालम्बं करोति कमलाग्रजा ||

अर्थ

साक्षातलक्ष्मी उद्योगी माणसाचा हात आपल्या हाती घेते. निरुद्योगी माणसाचा हात अक्काबाई - तिची थोरली बहिण; अवदसा - धरते.

४२२. अत्यादरो भवेद्यत्र कार्यकारणवर्जित: |

तत्रशङ्काप्रकर्तव्यापरिणामे सुखावहा ||

अर्थ

जिथे कारण नसतानाही अतिशय आदर दाखवला तेथे संशय मनात धरून [ काही काळबेर नाही याची खात्री करून ] वागणे हे परिणामाच्या दृष्टीने चांगले असते.

४२१. आलस्यं यदि न भवेज्जगत्यनर्थ: को न स्याद्बबहुधनको बहुश्रुतो वा |

आलस्यादियमवनि: ससागरान्ता सम्पूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च ||

अर्थ

आळस नावाचा अनर्थ या जगात नसेल [उरला नाही] तर कोण बरे श्रीमंत किंवा विद्वान होणार नाही [प्रत्येकजण उत्कृष्ट ज्ञान मिळवेल ] यापृथ्वीवर आळस टिकून आहे म्हणूनच समुद्राने वेढलेली ही पृथ्वी नरपशूंनी - क्रूर लोकांनी आणि दळभद्री लोकांनी भरून उरलीय.

४२०. खल: करोति दुर्वुत्तं नूनं फलति साधुषु |

दशाननोऽहरत्सीतां बन्धनं च महोदधे: ||

अर्थ

दुष्ट मनुष्य काहीतरी लफड करून ठेवतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात कायमचे एखाद्या सज्जनाला. हेच पहाना सीता पळवली रावणाने आणि सेतुबन्धन मात्र कायम पडलं महासागरावर.

४१९. अकर्णमकरोच्छेषं विधिर्ब्रह्माण्डभङ्गधीः |

श्रुत्वा रामकथां रम्यां शिरः कस्य न कम्पते ||

अर्थ

[अतिशय] सुंदर रामकथा ऐकून कोणाचे मस्तक डोलणार नाही? [म्हणूनच शेषाने जर रामकथा ऐकली त्याचे मस्तक डोलावाल्यामुळे त्याच्या मस्तकावरील] पृथ्वीगोल कोसळून फुटेल या भीतीने ब्रह्मदेवाने त्याला कर्णहीन बनवले आहे.

४१८. शनैः पन्थाः शनैः कन्थाः शनैः पर्वतमस्तके |

शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ||

अर्थ

मार्ग आक्रमण करणे; सन्यासी बनणे; डोंगरमाथ्यावर चढून जाणे; विद्याध्यायन करणे; धन मिळवणे या पाच गोष्टी हळू हळू अवास्तव घाई न करता साधाव्यात. घाई केली की त्याचे दुष्परिणाम चिरकाल भोगावे लागतात.

४१७. विषभारसहस्रेण गर्वं नायाति वासुकिः |

वृश्चिकोबिन्दुमात्रेणोर्ध्वं वहति कण्टकम् ||

अर्थ

[नागराज ] वासुकी विषाचा प्रचंड साठा जवळ असूनही त्याचा गर्व बाळगत नाही. विंचवाजवळ थेंबभरच विष असेल पण तो नांगी [गर्वाने] सतत वर करून चालतो.

Friday, July 29, 2011

४१६. निर्गुणेष्वपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवः |

न हि संहरते ज्योत्स्नां चन्द्रः खलनिकेतनात् ||

अर्थ

सज्जन गुणहीन प्राणिमात्रांवरहि दया करतात. चन्द्र आपले दुष्ट माणसाच्या घरावर पडणारे चांदणे आवरून घेत नाही. [ आपल्या चांदण्याच्या शीतलतेचे सुख दुष्टालाही मिळू देतो.]

४१५. विद्वानेव विजानाति विद्वज्जनपरिश्रमम् |

न हि वन्ध्या विजानाति गुर्वीं प्रसववेदनाम् ||

अर्थ

विद्वानांचे श्रम विद्वानांनाच कळतात. प्रसूतीच्या जीवघेण्या असह्य कळा वान्झोटीला कशा कळणार?

४१४. यस्यास्ति सर्वत्र गति: स कस्मात् स्वदेशरागेण हि याति नाशम् |

तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणा क्षारं जलं कापुरुषा पिबन्ति ||

अर्थ

ज्याला बुद्धीच्या जोरावर सर्वत्र मुक्त; मनसोक्त संचार; व्यवहार करता येतो तो नको तिथे स्वदेशावर प्रेम करत विनाश कशाला ओढवून घेईल? " आमच्या वाडवडिलांची विहीर " या वृथाभिमानाने तिचे दूषित वा खारे पाणी फक्त कोत्या मनोवृत्तीचे लोकच पीत बसतील.

४१३. उपचार: कर्तव्यो यावदनुत्पन्नसौहृदा: पुरुषा: |

उत्पन्नसौहृदानामुपचार: कैतवं भवति ||

अर्थ

जोपर्यंत स्नेह निर्माण झाला नाही तोपर्यंत माणसाच्या वागण्यात औपचारिकपणा असावा. मात्र एकदा स्नेह जमला की औपचारिकपणे वागणे हे नाटकीपणाचे ठरते.

Monday, July 25, 2011

४१२. जिव्हे प्रमाणं जानीहि भोजने भाषणेऽपि च |

अतिभुक्तिरतीवोक्तिः सद्यः प्राणापहारिणी ||

अर्थ

अग जिभे; तुझं खाणं आणि बोलणं जरा प्रमाणबद्ध असू देत कारण अति खाणं आणि [वायफळ] बडबड या दोन्ही गोष्टी प्राणघातक असतात.

४११. शुन: पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना |

न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ||

अर्थ

विद्येशिवाय असलेले जीवन हे कुत्र्याच्या शेपटासारखे व्यर्थ - निरुपयोगीच होय. धड गुह्येन्द्रिये झाकली जात नाहीत आणि माशांसारखे चावणारे कीटकही हाकलता येत नाहीत. त्यामुळे ते चावतातच.

४१०. देवतासु गुरौ गोषु राजसु ब्राह्मणेषु च |

नियन्तव्य: सदा कोपो बालवृद्धातुरेषु च ||

अर्थ

देवदेवता; गुरु - वडिलधारी मंडळी; गाई; राजे; ब्राह्मण; लहान मुले; म्हातारी माणसे आणि आजारी यांच्यावरचा राग नेहमी आवरता घ्यावा [एकदम संतापल्यास अनर्थ घडू शकतात.]

४०९. क्वचिद्रुष्टः क्वचित्तुष्टः रुष्टस्तुष्टः क्षणे क्षणे |

अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयङ्करः ||

अर्थ

कधी रागावतो तर कधी अत्यंत प्रसन्न होतो असे ज्याचे रुसणे वा हसणे क्षणोक्षणी बदलते, अशा अस्थिर मनाच्या माणसाची कृपा सुद्धा प्रसंगी घातक ठरू शकते. [त्याच्याशी फारसा संबंध ठेवू नये.]

Friday, July 22, 2011

४०८. भये वा यदि वा हर्षे सम्प्राप्ते यो विमर्शयेत् |

कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् ||

अर्थ

भीती किंवा अत्यानंदाच्या प्रसंगी जो विचारपूर्वक कृती करतो; [ अविचाराने काही करत नाही ] त्याला कधीच दुःख होत नाही.

४०७. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मति: |

खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनाग्यतः ||

अर्थ

सज्जनाची अन्तःकरणे भलतीच कठोर असतात असे माझे [स्पष्ट ] मत आहे. कारण दुष्टांच्या तीक्ष्ण अशा वाग्बाणांनी ती किंचितही विद्ध होत नाहीत.

Wednesday, July 20, 2011

४०६. अभ्रच्छाया खलप्रीतिः समुद्रान्ते च मेदिनी |

अल्पेनैव विनश्यन्ति यौवनानि धनानि च ||

अर्थ

[आकाशातील] ढगांची रचना; दुष्ट लोकांच प्रेम; समुद्राच्या काठावरची जमीन; तारुण्य आणि संपत्ती या गोष्टी अगदी

छोट्याशा कारणांनी सुद्धा नष्ट होऊ शकतात.

४०५. माता गुरुतरा भूमे: खात्पितोच्चोतरस्तथा |

मन: शीघ्रतरं वाताच्चिन्ता बहुतरी तृणात् ||

अर्थ

आई ही पृथ्वीहून मोठी असते; वडील योग्यतेने आकाशाहून थोर; विशाल असतात. मन हे वाऱ्यापेक्षाही चंचल असते तर

चिंता ही भूमीवरील गवताहून सुद्धा उदंड असते. [गवत फार झपाट्यानी वाढतं तसं काळजी कशाचीही आणि फार वाटत राहते.]

४०४. आरोप्यते शीला शैले यत्नेन महता यथा |

निपात्यते क्षणेनाधस्तथात्मा गुणदोषयो: ||

अर्थ

एखादी [प्रचंड] शिळा पर्वताच्या माथ्यावर न्यायला खूपच प्रयत्न करावे लागतात पण खाली पाडायला मात्र एका क्षणात ती

ढकलून देता येते, त्याचप्रमाणे गुण अंगी बाणवायला खूप कष्ट पडतात. दोष मात्र लगेच अंगात भिनतात.

४०३. एकमेवाक्ष्ररं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोधयेत् |

पृथिव्यां नास्ति तद्द्रव्यं यद्दत्वा चानृणी भवेत्‌ ||

अर्थ

या जगात अशी कोणतीही वस्तू नाही की जी दिली असता गुरुने जरी अगदी थोडेसे ज्ञान दिले असले तरी, ज्ञानी झालेला

शिष्य ती देऊन ज्ञानदानाच ऋण फेडू शकेल.

४०२. अपि सम्पूर्णतायुक्तैः कर्तव्या: सुहृदो बुधैः |

नदीश: परिपूर्णोऽपि चन्द्रोदयमपेक्षते ||

अर्थ

जरी [आपण] सर्व [गुणांनी ; वस्तूंनी ] परिपूर्ण असलो तरी सुद्धा शहाण्या माणसांनी मित्र मिळवले पाहिजेत. समुद्र हा पाण्याने

[पूर्ण ] असुनसुद्धा चंद्रोदयाची वाट पाहत असतो.

Wednesday, July 13, 2011

४०१. दूरस्था: पर्वता रम्या; वेश्या च मुखमण्डने |

युद्धस्य वार्ता रम्या ; त्रीणि रम्याणि दूरतः ||

अर्थ

पर्वत लांबूनच सुंदर दिसतात. तसेच वेश्यांचे मुख [नटणे] दुरूनच रम्य वाटते. युद्धाच्या बातम्या - अनुभव श्रवणीय असतो. या तीन गोष्टी दुरूनच सुंदर दिसतात [ त्यांचा अनुभव घेणे फार त्रासदायक असते. ]

४००. इयं सुस्तनी मस्तकन्यस्तकुम्भा कुसुम्भारुणं चारू चेलं दधाना |

समस्तस्य लोकस्य चेत:प्रवृत्तिं गृहीत्वा घटे न्यस्य यातीव भाति ||

पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

उभारदार स्तन असलेली ही सुंदर लालसर वस्त्र नेसलेली [मला तर अस वाटतंय की] जणू काही मार्गातल्या सर्व लोकांची अंत:करणे ती डोक्यावरच्या घटात ठेवून घेऊन चाललीय.

Monday, July 11, 2011

३९९. अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम् |

फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||

अर्थ

बिनहाताचे प्राणी हात असणाऱ्या प्राण्यांचे; पाय नसणारे प्राणी चार पाय असणारांचे; लहान प्राणी मोठ्यांचे आशा तऱ्हेने एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन [भक्ष्य] असतो.

३९८. कीटोऽयं भ्रमरी भवेदविरतध्यानात्तथा चेदहं रामः स्यां , त्रिजटे , तथा ह्यनुचितं दाम्पत्यसौख्यच्युतः |

एवं चेत्कृतकृत्यतैव भविता ; रामस्तव ध्यानतः सीता ; त्वं च निहत्य राक्षसपतिं सीतान्तिकं यास्यसि ||

अर्थ

[अशोकवनात सीता आणि त्रिजटा राक्षसी यांच्या मधील संवाद] सीता म्हणते; " बाई ग त्रिजटे, [मला भीती वाटते] ज्याप्रमाणे किडा सतत कुंभार माशीचे ध्यान केल्यामुळे त्याच रूपाचा होतो, तसं रामाचे अखंड चिंतन केल्यामुळे मी रामच बनले तर? संसारसुखाची हानी होईल" यावर त्रिजटा उत्तर देते; ' अग मग फारच उत्तम. राम सुद्धा तुझ्या चिंतनाने सीता बनेल मग राम बनलेली तू रावणाचा वध करशील आणि तुझ्या लाडक्या सीतेकडे जाशील".

३९७. महीपते: सन्ति न यस्य पार्श्वे कवीश्वरास्तस्य कुतो यशांसि |

भूपा: कियन्तो न बभूवुरुर्व्यां नामापि जानाति न कोऽपि येषाम् ||

अर्थ

ज्या राजाच्या आश्रयाला मोठमोठे कवी नसतात त्याची कीर्ति वाढणे कसे शक्य आहे? असे किती तरी राजे होऊन गेले आहेत की ज्यांची नावे सुद्धा कोणाला माहित नाहीत.

३९६. वेषं न विश्वसेत् प्राज्ञो वेषो दोषाय जायते |

रावणो भिक्षुरूपेण जहार जनकात्मजाम् ||

अर्थ

वेशभूषेवर माणसाने विश्वास ठेवू नये. [वेषांतराला फसू नये.] त्यामुळे दोष [नुकसान] होते. रावणाने भिकाऱ्याच्या वेषात येऊन सीतेला पळवले.

३९५. मन्दोऽप्यमन्दतामेति संसर्गेंण विपश्चितः |

पंकच्छिदः फलस्येव निकषेणाविलं पयः ||

अर्थ

निवळीचे फळ पाण्यात घातले की ज्याप्रमाणे गढूळ पाणी सुद्धा स्वच्छ होते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या सहवासात मंद सुद्धा बुद्धीमान होतो.

३९४. ऋणशेषोऽग्निशेषश्च शत्रुशेषस्तथैव च |

पुन: पुन: प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न रक्षयेत् ||

अर्थ

कर्जाची बाकी, न विझलेला अग्नी व शिल्लक उरलेले शत्रु पुन्हा पुन्हा वाढतात म्हणून या गोष्टीत बाकी ठेऊ नये.

Tuesday, July 5, 2011

३९३. कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् |

महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालत: ||

अर्थ

काम [मदतीचे] लहानसे का होईना योग्य वेळी केल्यास मदत केली [असं ज्याला केली त्याला ] वाटते. परंतु अयोग्य वेळी [वेळ निघून गेल्यावर बरीच मदत करूनही निष्फळ ठरते.

३९२. किं मिष्टमन्नं खरसुकराणां किं रत्नहार: मृगपक्षिणां च |

अन्धस्य दीप: बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसङ्ग: ||

अर्थ

गाढवे आणि डुकरे यांना पक्वान्नाचे काय? पशुपक्षांना रत्नहाराचे काय? आंधळ्याला दिव्याचा; बहिऱ्याला गाण्याचा व मूर्खाला शास्त्रकथांचा काय उपयोग?

३९१. गुणेषु क्रीयतां यत्नः किमाटोपैः प्रयोजनम् |

विक्रीयन्ते न घण्टाभिः गावः क्षीरविवर्जिताः ||

अर्थ

गुण [अंगी बाणवण्याचा] प्रयत्न करावा. [नुसता] खटाटोप [बडेजाव] करून काय उपयोग? [जसे] दूध नसलेल्या [भाकड] गाई [केवळ गळ्यात] घंटा बांधून विकल्या जात नाहीत.

३९०. हीनसेवा न कर्तव्या कर्तव्यो महदाश्रय: |

पयोऽपि शौण्डिकीहस्ते वारुणीत्यभिधीयते ||

अर्थ

नीच माणसाची सेवा करू नये. थोरांचा आश्रय घ्यावा. [असं पहा की] दारू विकणाऱ्या स्त्रीच्या हातात दूध असलं तरी [त्याला] दारू असं म्हटल जात.

३८९. पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका |

भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुंधरा ||

अर्थ

[खरं तर] पावला पावलावर रत्ने आणि एक योजन अंतरावर पाण्याने भरलेली विहीर असते. पृथ्वी अनेक मौल्यवान गोष्टीनी परिपूर्ण आहे. पण दुर्दैवी माणसांना त्या गोष्टी दिसत नाहीत. [चांगल्या गोष्टी पाहण्याची नजर पाहिजे.]

३८८. परनिन्दासु पाण्डित्यं स्वेषु कार्येष्वनुद्यमः |

प्रद्वेषश्च गुणज्ञेषु पन्थानो ह्यापदां त्रयः ||

अर्थ

दुसऱ्याची निंदा करण्यात हुशारी; स्वतःचे काम करण्याचा कंटाळा आणि गुण जाणणारांचा द्वेष करणे ह्या तीन गोष्टी म्हणजे संकटांकडे नेणारे रस्ते आहेत.

Wednesday, June 29, 2011

३८७. गावो गन्धेन पश्यन्ति वेदैः पश्यन्ति वै द्विजाः |

चारैः पश्यन्ति राजानः चक्षुर्भ्यामितरे जनाः ||

अर्थ

गाई वासाने [आसपासच्या गोष्टी] ओळखतात. ब्राह्मण ज्ञानाने [सारासार विचार करून] जाणतात. राजे हेरांकडून खबरी मिळवतात. [सामान्य] माणसांना [मात्र] डोळ्याला दिसेल तेवढच खरं असं वाटत.

३८६. गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा |

अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपपद्यते ||

अर्थ

गुरुची सेवा करून; पुष्कळ धन [फी] देऊन किंवा [एका] विद्येच्या मोबदल्यात [दुसरं] ज्ञान [हे विद्याप्राप्तीचे तीन मार्ग आहेत] याशिवाय अन्य मार्गांनी विद्या मिळू शकत नाही.

३८५. वैरिणा सह सन्धाय विश्वस्तो यो हि तिष्ठति |

स वृक्षाग्रे प्रसुप्तो हि पतितः प्रतिबुध्यते ||

अर्थ

जो मनुष्य शत्रूशी समेट करून त्यावर विसंबून राहतो; तो झाडाच्या शेंड्यावर झोपी गेलेल्या माणसाप्रमाणे [खाली] पडल्यावरच जागा होतो. [तह झाला तरी दक्ष राहिले पाहिजे.]

३८४. मर्कटस्य सुरापानं तत्र वृश्चिकदंशनम् |

तन्मध्ये भूतसंचारो किं ब्रूमो वैकृतं तदा ||

अर्थ

[आधीच माकड] त्याने दारू पिणे; त्यात त्याला विंचू चावणे आणि त्यातच त्याला भूतबाधा झाल्यास ते काय करामती करेल त्याविषयी काय सांगावे?

३८३. दिवसेनैव तत्कुर्याद्येन रात्रौ सुखं वसेत् |

पूर्वे वयसि तत् कुर्याद्येन वृद्धः सुखी भवेत् ||

अर्थ

दिवसभरात असं काम करावं की ज्यामुळे रात्री चांगली [वाईट काम केल्यास मन खात आणि झोप लागत नाही] झोप लागेल. आयुष्याच्या सुरवातीला अशी [चांगली] कामं करावी की म्हातारपण सुखात जाईल. [आपण आईवडीलांच चांगल केल्यास ते पाहून मुलांना आपली सेवा करावी असं वाटण्याची शक्यता असते.]

३८२. गिरिर्महान् गिरेरब्धेर्नभो महत् |

नभसोऽपि महद् ब्रह्म ततोप्याशा गरीयसी ||

अर्थ

पर्वत मोठा असतो. त्याच्यापेक्षाही समुद्र मोठा. समुद्राहून आकाश विस्तृत. आकाशापेक्षा ब्रह्म विशाल. [पण] आशा त्यापेक्षाही मोठी असते. [माणसाला इतकी आशा असते ती कधीही पूर्ण होत नाही.]

Wednesday, June 22, 2011

३८१. न हि ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वं गुणैर्ज्येष्ठत्वमुच्यते |

केतकीवरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम् ||

अर्थ

वयाने [किंवा आकाराने] मोठा असणा-यास [खरा ] मोठेपणा नसतो. गुणांमुळे खरे मोठेपण मिळते. [जसे ] केवड्याच्या सुंदर पानामध्ये लहान पानास महत्व असते. [कारण ते सर्वात सुवासिक असते.]

Monday, June 20, 2011

३८०. वसन्त्यरण्येषु चरन्ति दूर्वाः जलं वनस्थं च मृगाः पिबन्ति |

तथापि हिंसन्ति नराः सदा तान् को रञ्जने सर्वजनस्य शक्तः ||

अर्थ

हरणे ही अरण्यात राहतात; गवत खातात; अरण्यात असलेलेच पाणी पितात. तरी सुद्धा [माणसांचा काही अपराध केलेला नसताना] माणसे त्यांना नेहमी मारतात. कोण बरे सर्व लोकांना खूष ठेवू शकतो?

३७९. अकृत्वा परसंतापमगत्वा खलनम्रताम् |

अनुत्स्रृज्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||

अर्थ

दुसऱ्यांना त्रास न देता; दुष्ट माणसांशी लाचारी न करता आणि सज्जनांनी [मळलेली] दाखवलेली वाट न सोडता, [आपण] जे प्राप्त करून घेऊ ते [दिसायला] थोड दिसलं तरी [त्याचं आपल्या दृष्टीनी मूल्य] खूप मोठं आहे.

३७८. न पण्डिता: साहसिका: भवन्ति श्रुत्वापि ते संतुलयन्ति तत्वम् |

तत्वं समादाय समाचरन्ति स्वार्थं प्रकुर्वन्ति परस्य चार्थम् ||

अर्थ

विद्वान [अति] धाडसी नसतात. एखादी गोष्ट ऐकून ते सर्व परिस्थिती पडताळून पाहतात. त्यातील मर्म लक्षात घेऊन ते [त्याप्रमाणे आचरण करतात] स्वतःचा आणि दुसऱ्याचा फायदा साधतात.

३७७. सर्पा: पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैः तृणैः वनगजा बलिनो भवन्ति |

कन्दैः फलैः मुनिवरा क्षपयन्ति कालं सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ||

अर्थ

साप [फक्त] वारा पिऊन जगतात, तरीही ते दुबळे नसतात. वाळलेल्या गवताने रानटी हत्ती बलवान होतात. कंदमुळे; फळे खाऊन ॠषीवर्य काल घालवतात. समाधान हाच माणसाचा खरा [श्रेष्ठ] ठेवा आहे [हव्यासाच्या पाठीमागे लागून आयुष्य दु:खी करण्यापेक्षा आहे त्यात आनंदी राहण्यास शिकावे.

३७६. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् |

अन्यदेहविलसत्परितापात् सज्जनो द्रवति नो नवनीतम् ||

अर्थ

चांगल्या माणसाचे अंत:करण लोण्यासारखे असते असे जे कवी म्हणतात ते खोटे आहे [कारण ] दुसऱ्याच्या देहाला झालेल्या दुःखामुळे सज्जनाचे अंत:करण पाझरते. लोणी मात्र [दुसऱ्या पातेल्याला आच लागल्यावर] वितळत नाही.  [हे व्यतिरेक अलंकाराचे सुंदर उदाहरण आहे.]

Wednesday, June 15, 2011

३७५. कोकिलानां स्वरो रूपं ; स्त्रीणां रूपं पतिव्रतम् |

विद्या रूपं कुरूपाणां ;क्षमा रूपं तपस्विनाम् ||

अर्थ

सुंदर आवाज हेच कोकिळेच सौंदर्य असतं. पातिव्रत्य हे स्त्रीच सौंदर्य असतं. मनुष्य कुरूप असला तरी विद्वत्ता हे त्याच सौंदर्य असतं. क्षमा करणं हा तपस्व्यांचा स्वभाव असतो.

Tuesday, June 14, 2011

३७४. एको दशसहस्राणि योधयेद्यस्तु धन्विनाम् |

शस्त्रशास्त्रप्रवीणश्च विज्ञेयः स महारथ:||

अर्थ

जो योद्धा शस्त्रशास्त्र विद्येत निपुण असून एकटा दहा हजार योध्यांशी युद्ध करू शकतो त्याला महारथी म्हणतात.

Monday, June 13, 2011

३७३. धर्म: यो बाधते धर्मान् स धर्म: कुधर्मक: |

अविरोधात्तु यो धर्म: स धर्म: सत्यविक्रम: ||

अर्थ

जो धर्म हा इतर धर्मांवर अतिक्रमण [धर्मांतराची सक्ती; कर; त्यांची पूजास्थाने पाडणे वगैरे ] तो धर्म वाईट होय. जो धर्म [दुसऱ्या धर्मांशी ]सहिष्णू आचरण करतो तो खरा श्रेष्ठ धर्म होय.

३७२. कवय: किं न पश्यन्ति ; किं न कुर्वन्ति योषितः |

मद्यपा: किं न जल्पन्ति ; किं न भक्षन्ति वायसा: ||

अर्थ

कवी [ ज्ञानी लोक ] काय पाहू शकणार नाहीत? स्त्रिया [चांगलं किंवा वाईट ] काय करू शकणार नाहीत? दारुडे लोक काय बरळत नाहीत? कावळे काय खात नाहीत?

३७१. कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारणम् |

इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम् ||

महाभारत श्रीव्यास

अर्थ

राजा असं वागतोय कारण दिवसच असे आले आहेत की दिवस तसे [चांगले किंवा वाईट ] आले आहेत. याचं कारण राजा, अशी शंका सुद्धा मनात आणू नकोस. राजा [प्रशासक] हाच काळाचे कारण असतो.

३७०. ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |

उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

भवभूति उत्तररामचरित

अर्थ

या जगात जे कोणी आमची अवहेलना करीत असतील; त्यांना जे काय कळत असेल ते असो; आमची ही धडपड त्यांच्यासाठी नाहीयेच. काळ हा अनंत आहे आणि ही पृथ्वी पण विशाल आहे. केंव्हातरी आमच्यासारखा जाणकार होईलच की तो आमच्या प्रयत्नांच कौतूक करेलच.

Thursday, June 9, 2011

३६९. वसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशीविषेण वा |

न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ||

अर्थ

एकवेळ वैर्‍याबरोबर राहावे; फार काय क्रुद्ध असा विषारी नाग सोबत असला तरी चालेल; पण मित्र असल्याचे भासवून शत्रूशी संबध ठेवाणा-राच्या सहवासात कधीही राहू नये.

३६८. एकं विषरसो हन्ति; शस्त्रेणैकश्च वध्यते |

सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ||

अर्थ

विष पाजलं तर ते एकालाच ठार करते; आयुधांनी एकाच माणसाला मारता येत. पण एखादं [सामरिक] खलबत सर्व प्रजेसकट संपूर्ण राज्याला आणि राजाला नष्ट करते.

Tuesday, June 7, 2011

३६७. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्महैश्वर्यंलीलाजनितजगतः खण्डपरशोः |

श्रुतीनां सर्वस्वं; सुकृतमथ मूर्तं सुमनसां सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु ||

गङ्गालहरी : पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

या संपूर्ण पृथ्वीच जे काही पूर्ण असं सौभाग्य; स्वतःच्या लीलेने निर्माण केलेल्या या विश्वातील श्री शिवांचे महान वैभव; श्रुतींचे सारसर्वस्व; सज्जनाचे प्रत्यक्ष पुण्य; मधुर अमृताचे जे लावण्य असे तुझे जल ते [हे गंगामाई] आमचे अकल्याण; अशुभ नष्ट करो.

३६६. आत्मन: परितोषाय कवे: काव्यं तथापि तत् |

स्वामिनो देहलीदीपसममन्योपकारकम् ||

अर्थ

कवी [स्वान्तसुखाय] स्वतःला अति आनंदित करण्यासाठी काव्यरचना करतो. [दोन खोल्यांमधिल] उंबरठ्यावर असलेल्या दिव्याप्रमाणे ते स्वामीला [कवीला] आणि रसिकाला आनंदित करते.

३६५. जाता शिखण्डिनी प्राक् यथा शिखण्डी तथावगच्छामि |

प्रागल्भ्यमधिकमवाप्तुं वाणी बाणो बभूव ह ||

अर्थ

ज्याप्रमाणे पूर्वी शिखंडिनीचा जन्म झाला आणि नंतर [आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी तिने] शिखण्डीचे [रूप] घेतले. त्याचप्रमाणे मला [कवीला] असं लक्षात येतंय कि अधिक कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी देवी सरस्वतीने बाण म्हणून जन्म घेतला. [स्वतः देवी सरस्वती पेक्षाही बाण या विद्वानाचं वाङ्मय अधिक सुंदर आहे.]

Friday, June 3, 2011

३६४. स्वच्छन्दवनजातेन शाकेनापि प्रपूर्यते |

अस्य दग्धोदरस्यार्थे क:कुर्यात्पातकं महत् ||

हितोपदेश

अर्थ

वास्तविक पहाता हे वैतागवाणं पोट; रानावनात सहजी उगवलेल्या पालेभाजीनही भरणं शक्य असताना कोणता [शहाणा माणूस] त्यासाठी भलं मोठं पाप करील?

Thursday, June 2, 2011

३६३. सेवेव मानमखिलं; ज्योत्स्नेव तमो; जरेव लावण्यम् |

हरिहरकथेव दुरितं गुणशतमप्यर्थिता हरति ||

अर्थ

नोकरी जशी सगळा मानसन्मान नष्ट करते; चांदणे जसे अंधार नाहीसा करते; म्हातारपण जसे सौंदर्याला बाधक ठरते; हरिकथा जशी सगळ्या पापाना नष्ट करते तसेच एकटी याचना ही शंभर गुण नाहीसे करते.

३६२. कन्दुको भित्तिनिक्षिप्त इव प्रतिफलन्मुहुः |

आपत्यात्मनि प्रायो दोषोऽन्यस्य चिकीर्षितः ||

अर्थ

भिंतीवर कितीही वेळा चेंडू टाकला तरी प्रत्येक वेळेला तो आपल्याकडेच येतो; त्याप्रमाणे दुस-याला आपण दोष देऊ लागलो किंवा त्याचे दोष काढू लागलो कि ते आपल्याच ठिकाणी निर्माण होऊ लागतात.

३६१. यदि वा याति गोविन्दः मथुरातः पुनः सखि |

राधायाः नयनद्वन्द्वे राधानामविपर्ययः ||

अर्थ

अग सखी; जर श्रीकृष्ण मथुरेतून निघून गेला तर राधेच्या दोन्ही डोळ्यातून राधा या नावाचा विपर्यय [बरोबर उलट स्थिती राधा - उलट -धारा ] दिसून येते.

३६०. शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी |

विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||

अर्थ

[श्लोक १११ मध्ये ३-४ चरण असाच असलेला श्लोक आहे त्या कवीच्या बरोबर उलट येथे मत प्रकट केले आहे] गौतम ॠषीच्या धर्मपत्नीचा तरुण असलेल्या माघोन्याने [इंद्राने] बळजबरीने श्वानाप्रमाणे [कुत्र्याप्रमाणे] विनयभंग केला. म्हणूनच विचारपूर्वक पाणिनिने त्या तिघांना एकत्र एका सूत्रात कोंबले आहे.

३५९. शिरः शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्तः क्षितिधरं महीध्रादुत्तुङ्गादवनिमवनेश्चापि जलधिम् |

अधोऽधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमधुना विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ||
   
अर्थ

सारासार विचार नष्ट झालेल्यांचा अध:पात कसा शेकडो मार्गांनी होतो. [पहा] गंगा ही स्वर्गातली [सर्वोच्चपदी असलेली] नदी तिथून खाली आली ती शंकराच्या डोक्यावर. तिथून खाली आली ती हिमालयावर, तिथून उतरली ती जमिनीवर, तिथूनही वाहत सुटली ती चक्क महासागरापर्यंत थांबलीच नाही. एकदा विवेक सुटला कि संपलच सगळं!

Friday, May 27, 2011

३५८. शयनं पित्तनाशाय; वातनाशाय मर्दनम् |

वमनं कफनाशाय; ज्वरनाशाय लङ्घनम् ||

अर्थ

पित्तनाश करायचा असेल तर पुरेशी झोप घ्यावी. वात नाहीसा करायचा असेल तर अंग रगडून घ्यावे. कफ नाहीसा करायचा असेल तर उलट्या होतील असे करावे व ताप हटवायचा असेल तर पूर्ण लंघन करावे.

३५७. अतिमात्रबलेषु चापलं विदधानः कुमतिर्विनश्यति |

त्रिपुरद्विषि वीरतां वहन्नवलिप्तः कुसुमायुधो यथा ||

अर्थ

महाबलाढ्य लोकांशी साहसाने वागू पाहणारा मूर्ख धुळीलाच मिळतो. ज्याप्रमाणे मदन आपल्या सामर्थ्याच्या फाजील विश्वासाने गर्विष्ठ होऊन शंकरांना आपलं बळ दाखवायला गेला [आणि भस्मसात झाला] तसंच.

Thursday, May 26, 2011

३५६. सर्वत्र जयमन्विच्छेत्पुत्रादिच्छेत्पराजयम् |

वासुदेवं नमस्यन्ति; वसुदेवं न ते नराः ||

अर्थ

सगळ्या जगात विजय मिळवण्याची इच्छा धरावी; मुलाकडून [आणि शिष्याकडून] मात्र पराजय व्हावा अशी इच्छा करावी; [मुलगा किंवा शिष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ - वरचढ व्हावा अशी इच्छा करावी] सगळे लोक वासुदेवाला - वसुदेवाच्या मुलाला नमस्कार करतात [त्यातच पित्याला अधिक आनंद होतो]

Tuesday, May 24, 2011

३५५. न क्वचिच्च बहिर्यान्ति मानिनां प्रार्थनागिरः |

यदि निर्यातुमिच्छन्ति तदा प्राणपुरस्सराः ||


अर्थ


स्वाभिमानी माणसाच्या तोंडून कधी याचनेचे शब्द बाहेर पडणारच नाहीत. पडण्याचा प्रसंग आला तर आधी प्राण बाहेर पडतील मगच याचना. [मेल्यावर कसे शब्द बाहेर पडणार? म्हणजे देहात प्राण असेपर्यंत ते याचना करणार नाहीत. ]

Monday, May 23, 2011

३५४. कृतार्थः स्वामिनं द्वेष्टि ;कृतदारस्तु मातरम्‌ |

जातापत्या पतिं द्वेष्टि ; गतरोगश्चिकित्सकम् ||

अर्थ

[उद्देश] साध्य झाला कि नोकर मालकाला टाळू लागतो; लग्न झालं कि मुलगा आईला विसरतो; मूल झालं कि पत्नी पतीकडे दुर्लक्ष करू लागते आणि आजारातून उठल्यावर रोगी वैद्याकडे फिरकत नाही.

३५३. अङ्गणवेदी वसुधा; कुल्या जलधिः; स्थली च पातालम् |

वल्मीकश्च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ||

अर्थ

जो खंबीर मनोवृत्तीचा माणूस ध्येयासाठी कंबर कसून तयार असतो. ही [सप्तद्वीपा] वसुंधरा आपल्या घरासमोराच्या अंगणासारखी [लहान] वाटते. महासागर हा नदीच्या कालव्यासारखा भासतो. पाताळ म्हणजे फिरायला जायचे ठिकाण वाटते मेरू पर्वत मुंग्यांचे वारूळ वाटते.

३५२. स एव धन्यो विपदि यः स्वरूपं न मुञ्चति |

त्यजत्यर्ककरैस्तप्तं हिमं देहं ; न शीतताम् ||

अर्थ

कितीही संकटे आली तरी जो आपले स्वाभाविक गुण सोडत नाही तोच खरा धन्य होय. सूर्यकिरणांनी बर्फ जरी तापले तरी आपल्या देहाचे ते विसर्जन करील; वितळेल पण आपली शीतलता सोडणार नाही.

Thursday, May 19, 2011

३५१. क्षुध्-तृट्-आशाकुटुम्बिन्यः मयि जीवति नान्यगाः |

तस्मात् आशा महासाध्वी कदाचिन्मां न मुञ्चति ||

अर्थ

[कवींनी आपल्या आशाळभूतपणाच विनोदी अंगानी वर्णन केलं आहे] तहान; भूक आणि आशा या माझ्या [एकनिष्ठ] कारभारणी [बायका] आहेत मी जिवंत असे पर्यंत त्या दुसरीकडे पाहणार सुद्धा नाहीत आणि त्यात सुद्धा आशा ही महासाध्वी आहे ती केंव्हाही माझा त्याग करत नाही [खाण-पिणं झाल्यावर थोडावेळ तरी तहान-भूक त्रास देत नाही आशा मात्र कधीच पिच्छा सोडत नाही]

३५०. सत्यस्य वचनं श्रेयः सत्यादपि हितं वदेत् |

यद् भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम || नारदमुनी

अर्थ

सत्य बोलणं अधिक चांगले; [पण फक्त] खरं बोलण्यापेक्षा कल्याणकारक बोलावे. सत्य म्हणजे तरी काय कि जे प्राणीमात्रांचे अतिशय हित करेल तेच असे माझे मत आहे.

Wednesday, May 18, 2011

३४९. आरभन्तेऽल्पमेवाज्ञाः; कामं व्यग्रा भवन्ति च |

महारम्भाः कृतधियस्तिष्ठन्ति च निराकुलाः ||

अर्थ

अडाणी लोक लहानसेच काम हाती घेतात आणि त्यातच अगदी गुंतून पडतात. जाणते स्थिरबुद्धीचे लोक भले मोठे काम हातात घेऊन सुद्धा अत्यंत शांतपणे स्थिरबुद्धीने ते करत राहतात.

Monday, May 16, 2011

३४८. कुक्षेर्भागद्वयं भोज्यैस्तृतीये वारि पूरयेत् |

वायोः संचारणार्थाय चतुर्थमवशेषयेत् ||

अर्थ = जठराचे चार भाग कल्पून त्यापैकी दोन भाग अन्नाने भरावेत; तिसरा पाण्याने भरावा आणि वायु संचारणासाठी चवथा भाग मोकळा ठेवावा.

३४७. जातमात्रश्चिकित्स्यः स्यान्नोपेक्ष्योऽल्पतया गदः |

वह्निशत्रुविषैस्तुल्यः स्वल्पोऽपि विकरोत्यसौ ||

अर्थ

रोग झाला रे झाला कि त्यावर लगेच उपचार करावे; त्याची हेळसांड करू नये. नाहीतर अग्नि, शत्रू आणि विष यांप्रमाणे तो वाढत वाढत जाऊन अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो व असाध्य बनतो.

Tuesday, May 10, 2011

३४६. बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदुषिताः |

अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम् || नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

सुवचनांचा [कोणालाच उपयोग न होता ती ] स्वतःच्या ठिकाणीच गलीतगात्र होऊन जातात [कारण ] ज्ञानी लोकांना [एकमेकांचा ] मत्सर असतो [ते सुभाषितांची चर्चा करत नाहीत ]; सत्ताधारी लोकांना माजाची बाधा असते [ते कोणाला सुविचाराबद्दल चौकशी करत नाहीत ]उरलेल्या लोकांना काही ज्ञान नसल्याने त्यांना सुवचनांचा पत्ताच नसतो [त्यामुळे हे सर्व ज्ञान वाया जातं ]

३४५. कौपीनं; भस्मनां लेपो ; दर्भा ; रुद्राक्षमालिका |

मौनमेकान्तिका चेति मूर्खसंजीवनानि षट् ||

अर्थ

भगवी कफनी, भस्माचे पट्टे, दर्भ, रुद्राक्षांची माळ, मौन आणि एकटेच राहणे या सहा गोष्टी मूर्ख माणसाला संजीवन देणाऱ्या आहेत. [त्यांच्या आधारावर तो जगतो]

३४४. किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि, क्ष्मां न क्षिपत्येष यत् किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |

किंत्वंगीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||

अर्थ

कूर्म हा पाठीवरून पृथ्वीच ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? खरं तर एकदा सुरु केलेलं काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो [व] हाती घेतलं ते तडीस लावणं हे थोरांच कुलव्रतच असत.

[निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु - हे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच ब्रीदवाक्य आहे.]

Sunday, May 1, 2011

३४३. कुर्वन्नपि व्यलीकानि यः प्रियः प्रिय एव सः |

अशेषदोषदुष्टोऽपि कायः कस्य न वल्लभः ||

अर्थ

कितीही चुका, अप्रिय गोष्टी केल्या तरी जे आपल्याला आवडत ते लाडक असतंच, ते कधीही नावडत होत नाही. सगळ्या दोषांनी गच्च भरलेला [स्वतःचा] देह कोणाला बरे आवडत नाही?

३४२. न भृत्यपक्षपाती स्यात्प्रजापक्षं समाश्रयेत् |

प्रजाशतेन संदिष्टं संत्यजेदधिकारिणम् ||

अर्थ

राजाने कधी नोकराची बाजू घेऊ नये, प्रजेची बाजू घ्यावी. शंभर प्रजाजन सांगत असतील तर त्या अधिकाऱ्याचा राजाने सत्वर त्याग करावा.

Thursday, April 21, 2011

३४१. योगेश्वरश्च भगवान्भार्गवो भृगुतुल्यधीः |

शुक्रः पानमदात्तीव्राद् बुभुजे शिष्यमौरसम् ||

अर्थ

भृगुॠषीचा पुत्र, साक्षात त्यांच्या इतकाच बुद्धिमान शिवाय महान योगेश्वर असूनही अतिरिक्त मद्यपानामुळे, शिष्य असलेला व [जावई होऊ शकला असता असा कच ] त्यांचा औरस पुत्र झाला. [शुक्राचार्यांकडे शिकत असलेल्या कचाला संजीवनी विद्या मिळू नये म्हणून दैत्यांनी त्याला मारून , जाळून त्याची राख मद्यातून शुक्राचार्यांना पाजली पण देवयानीच्या हट्टामुळे त्यांनी संजीवनी मंत्र म्हटला आणि कच पोट फाडून बाहेर आला अशा रीतीने तो त्यांचा औरस पुत्र बनला. असा हा दारूचा दुष्परिणाम.]

Monday, April 18, 2011

३४०. अशेषलङ्कापतिसैन्यहन्ता श्रीरामसेवाचरणैककर्ता |

अनेकदुःखाहतलोकगोप्ता त्वसौ हनुमांस्तव सौख्यकर्ता ||

अर्थ

[हे मानवा] रावणाच्या सर्व सैन्याचा नाश करणारा; श्रीरामाची अनन्य भक्ति करणारा; दुःखाने अतिशय ग्रासलेल्या लोकांचे रक्षण करणारा हा हनुमान तुला आनंदी करेल.

आज हनुमान जयंती आहे त्यानिमित्त हा श्लोक.

३३९. अल्पतोयश्चलत्कुम्भो, अल्पदुग्धाश्च धेनवः |

अल्पविद्यो महागर्वी, कुरूपी बहुचेष्टितः ||

अर्थ

जिच्यात पाणी कमी आहे अशी घागर अतिशय आवाज करते, आटायला लागलेली गाय लाथाळ बनते, थोडंच ज्ञान असलेला मनुष्य महागर्विष्ठ असतो आणि रूपहीन माणूस नटवा [नखरेल] असतो.

३३८. ज्योतिषं जलदे मिथ्या, मिथ्या श्वसिनि वैद्यकम् |

योगो बह्वशने मिथ्या मिथ्या ज्ञानं च मद्यपे ||

अर्थ

पावसाबद्दल नेमकं भविष्य सांगतो, [असं बोलून उपयोग नसतो कारण तस कोणालाच नक्की सांगता येत नाही] श्वास लागल्यावर केलेले खोटे उपचार मिथ्या, खादाड माणसाला योग साध्य होईल हे खोटं आणि दारुड्याला शिकवलेलं ज्ञान सुद्धा निरुपयोगी असतं.

३३७. गुणानामेव दौरात्म्याद्धुरि धुर्यो नियुज्यते |

असंजातकिणस्कन्धः सुखं स्वपिति गौर्बलिः ||

अर्थ

गुणांच्या म्हणजेच, ओझे वाहण्याचा गुण, त्या गुणाच्या दुष्टपणामुळेच बैल जोखडाला जुंपला जातो. ज्याच्या खांद्यावर जोखडाचा घट्टा पडलेला नाही, असा धष्टपुष्ट बैल सुद्धा खुशाल झोपून राहतो.

३३६. गुर्वर्थे त्यक्तराज्यो व्यचरदनुवनं पद्मपद्भ्यां प्रियायाः पाणिस्पर्शाक्षमाभ्यां मृजितपथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम् |

वैरूप्याच्छूर्पंणख्याः प्रियविरहरुषाऽऽरोपितभ्रूविजॄम्भत्रस्ताब्धिर्बिद्धसेतुः खलदवदहनः कोसलेन्द्रोऽवतान्नः ||

अर्थ

वडिलांसाठी ज्याने राज्याचा त्याग केला, लाडक्या पत्नीला [पळवल्यानंतर] हनुमान आणि लक्ष्मण यांच्यासह कमलाप्रमाणे कोमल असे चरण असूनही जो वनात भटकत राहिला, शूर्पणखेला विद्रूप केलं, प्रियेच्या विरहामुळे रागावलेल्या ज्याने [क्रोधाने] भुवया वक्र केल्यामुळे घाबरलेल्या समुद्रावर ज्याने पूल बांधला, राक्षससेना रूपी वणव्यालाच जाळून टाकलं तो कोसलदेशचा राजा [प्रभू रामचंद्र ] आमचे रक्षण करो.

३३५. यदशक्यं न तच्छक्यं यच्छक्यं शक्यमेव तत् |

नोदके शकटं याति न च नौर्गच्छति स्थले ||

अर्थ

जे घडणे शक्य नसते ते [कितीहि प्रयत्न केले तरी] होऊ शकत नाही. जे घडणं शक्य आहे तसंच घडत. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी बैलगाडी पाण्यात हिंडू शकत नाही आणि नौका जमिनीवर चालत नाही.

३३४. अधः पश्यसि किं बाले, तव किं पतितं भुवि |

रे रे मूढ न जानासि गतं तारुण्यमौक्तिकम् ||

अर्थ

[एका म्हातारपणामुळे वाकून चालणाऱ्या वृद्ध स्त्रीला एका तरुणाने खवचटपणे विचाले] "ए मुली, एवढं वाकून काय शोधतेस? तुझ काही हरवलंय का ?" म्हातारी म्हणाली "अरे मूर्खा एवढं सुद्धा तुला समजत नाही? [माझ हरवलेलं] तारुण्य रूपी मोती मी शोधतेय".

३३३. रे रे घरट्ट मा रोदीः कं कं न भ्रामयत्यमूः |

कटाक्षवीक्षणादेव कराकृष्टस्य का कथा ||

अर्थ

अरे जात्या [धान्य दळण्याची चक्की, घरघर आवाज काढते] रडू नकोस रे. [स्त्रिया तुला गरगर फिरवतात म्हणून] अरे नुसत्या कटाक्ष टाकून त्या [पुरुषांना] नाचवतात. तुला तर [चक्क] हातानी खेचतात [तर फिरावंच लागणार] यात काय नवल?

Friday, April 8, 2011

३३२. नारिकेलसामाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |

अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ

सज्जन बाहेरून दिसायला आणि आतून असायला नारळासारखे असतात. इतर लोक मात्र बोरासारखे नुसते बाहेरून दिसायलाच चांगले असतात. [नारळ मोठे; टणक् शेंडीवाले खरखरीत असतात, पण आतलं पाणी आणि खोबर मोठं गोड असत. बोर मात्र बाहेरून मोठ्या मोहक रंगाची पण त्यांच अंतरंग खात्रीच नसतं.]

३३१. आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् |

दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ||

नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

दिवसाच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील [वेगवेगळया] सावलीप्रमाणे दुष्टाची व सज्जनाची मैत्री असते. [म्हणजे] सकाळची सावली जशी सुरवातीला मोठी पण पुढे पुढे कमी कमी होत जाणारी असते तशी दुष्टाची मैत्री प्रारंभी जास्त पण पुढे कमी कमी होत जाते. दुपारनंतरची सावली सुरवातीला लहान पण नंतर वाढत जाणारी असते तशी सज्जनाची मैत्री हळूहळू वाढतच जाते.

३३०. पीयुषेण सुरा; श्रिया मुररिपुर्मर्यादया मेदिनी शक्रः कल्परुहा शशाङ्ककलया श्रीशंकरस्तोषितः |

मैनाकादिनगा निजोदरगृहे यत्नेन संरक्षिताः मच्चूलीकरणे घटोद्भवमुनिः केनापि नो वारितः ||

अर्थ

[मी] अमृत देऊन देवांना; लक्ष्मी देऊन श्रीविष्णूला; [स्वतःला] मर्यादा घालून पृथ्वीला; कल्पवृक्ष देऊन इंद्राला; चन्द्रकला देऊन श्रीशिवला संतुष्ट केले. मैनाक वगेरे पर्वत सुद्धा प्रयत्नपूर्वक स्वतःच्या पोटात जाऊन सांभाळले. [पण अरेरे ] ज्यावेळी अगस्त्य ॠषी मला ओंजळीत घेऊन पिऊ लागला, त्यावेळी कोणीहि त्याला अडवले नाही.

३२९. दक्षः श्रियमधिगच्छति; पथ्याशी कल्यतां सुखमरोगी |

उद्युक्तो विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः ||

अर्थ

नित्य सावध असणाराला वैभव मिळते; पथ्याने राहणाऱ्याला आरोग्य; निरोगी माणसाला सुख; [सतत] अभ्यास करणाऱ्याला संपूर्ण विद्या आणि सुसंस्कार असणाऱ्याला धर्म; अर्थ आणि विविध प्रकारचे यश मिळते.

Tuesday, March 29, 2011

३२८. सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं परिपालनम् |

अनित्वात्तु चित्तानां मतिरल्पेऽपि भिद्यते ||


वाल्मिकी रामायण

अर्थ

मित्र मिळवणे अगदी सोपे आहे. पण मैत्री टिकवणे अतिशय अवघड आहे. मनाचा स्वभाव चंचल असल्यामुळे अगदी थोड्या गोष्टींवरून बुद्धी फिरते. [आणि भांडण होते]

३२७. बलवानपि निस्तेजाः कस्य नाभिभवास्पदम् |

निःशङ्कं दीयते लोंकैः पश्य भस्मचये पदम् ||

अर्थ

सामर्थ्य असूनही ज्याच्या ठिकाणी तेज नाही [जो स्वाभिमानीपण दाखवत नाही] त्याचा कोण बरे अपमान करीत नाही? पहा लोक राखेच्या ढिगाऱ्यावर खुशाल पाय देतात.

३२६. प्रजापीडनसंतापात् समुद्भूतो हुताशनः |

राज्ञः कुलं श्रियं प्राणान् नादग्ध्वा विनिवर्तते ||

अर्थ

प्रजेला त्रास दिल्यामुळे उत्पन्न झालेला [असंतोषाचा] अग्नि राजाचे ऐश्वर्य, घराणं आणि प्राण जाळल्याशिवाय माघारी फिरत नाही.

३२५. अनुकूले विधौ देयं, यतः पूरयिता हरिः |

प्रतिकुले विधौ देयं, यतः सर्वं हरिष्यति ||

अर्थ

नशीब अनुकूल असताना भरपूर द्यावे कारण पुरवणारा हरीच आहे [कमी पडणारच नाही] आणि दैव प्रतिकूल असताना देखील यथा शक्ति दान करावे, कारण नाही तरी सर्स्वाचे हरण होणारच आहे, मग निदान चांगला उपयोग तरी झाला.

Wednesday, March 23, 2011

३२४. उत्तमो नाति वक्ता स्यादधमो बहु भाषते |

सुवर्णें न ध्वनिस्तादृग्यादृक्कांस्ये प्रजायते ||

अर्थ

थोर माणूस फार बोलत नाही. अति बडबड करणारा माणूस क्षुद्र असतो. काशाचा जेवढा आवाज येतो तेवढा सोन्याचा येत नाही.

३२३. भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा |

लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ||

अर्थ

घाबरट माणसाला दरारा दाखवून दहशतीने फोडावे, तेच शूर माणसाला नम्रता दाखवून वळवावे, लोभी माणसाला पैसे देऊन आपलेसे करावे आणि बरोबरीच्या किंवा कमी दर्जाच्या माणसावर आपला प्रभाव पडून वश करून घ्यावे.

३२२. नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः |

तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम् ||

अर्थ

[या पाणिनीने आमचा सर्वस्वी घात केला त्याने] मन नपुंसक [लिंगी] असे सांगितल्यावरून आम्ही मनाला [बिनधास्त] प्रियेकडे पाठवलं आणि ते [बेट] तिथेच रमलं. पाणिनीनेच आम्हाला ठार केलं.

Friday, March 18, 2011

३२१. अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम् |

विषं सभा दरिद्रस्य; वृद्धस्य तरुणी विषम् ||

अर्थ

[शिकवलेल्याचा] अभ्यास केला नाही तर शास्त्र हे विषासारखे घटक होते. पहिले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा खाल्ले तर तेही विषच बनते. दरिद्री माणसाला सभा अनिष्ट ठरते. जक्ख म्हाताऱ्याला तरुणी विषतुल्य बनते.

Wednesday, March 16, 2011

३२०. दिग्वाससं गतव्रीडं जटिलं धूलिधूसरम् |

पुण्याधिका हि पश्यन्ति गङ्गाधरमिवात्मजम् ||

अर्थ

[अंगावर कपडे मुळीच नसलेलं] दिगंबर, [अजून] लाज वाटायला लागली नसलेलं, जावळ अस्ताव्यस्त उडणार, धुळीने सर्वांग माखलेल असं, शंकराची सगळी लक्षण असलेलं आपलं लेकरू बघण्याचं भाग्य पुण्यवंतानाच लाभत.

३१२. व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम् |

आयुः परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो लोकस्तथाप्यहितमाचरतीति चित्रम् ||

अर्थ

जरा [म्हातारपण] वाघिणी सारखी डरकाळ्यांनी भिववित समोर उभीच असते. रोग हे शत्रूसारखे शरीरावर घावावर घाव घालीतच असतात. तडा गेलेल्या माठातून पाणी झीरपावं तसं आयुष्य वेगानी कमी होतयं. तरीहि माणूस आपल्या अकल्याणाच्या गोष्टी करीतच असतो हे आश्चर्य आहे.

Monday, March 14, 2011

३१९. लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता |

दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ||

अर्थ

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड राहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरीरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या [चांगल्या] गोष्टी होतात.

३१८. अलङ्करोति हि जरा राजामात्यभिषग्यतीन् |

विडम्बयति पण्यस्त्रीमल्लगायकसेवकान् ||

अर्थ

वार्धक्य हे राजा, मंत्री, वैद्य, सन्यासी यांना भूषणास्पद असते. तर वेश्या, मल्ल, गायक, नोकर यांचे हाल करते, विडंबना करते.

३१७. शीलभारवती कान्ता पुष्पभारवती लता |

अर्थभारवती वाणी भजते कामपि श्रियम् ||

अर्थ

सत्चारित्र्य असणारी पत्नी, फुलांनी लगडलेली वेल, अर्थसंपृक्त भाषा यांना काही आगळेच सौंदर्य प्राप्त होते.

३१६. उद्योगः कलहः कण्डुर्द्यूतं मद्यं परस्त्रियः |

आहारो मैथुनं निद्रा सेवनात्तु विवर्धते ||

अर्थ

व्यवसाय, भांडण, अंगाची खाज, जुगार, दारू पिणं, परस्त्रीगमन, आहार, मैथुन आणि झोप या गोष्टी सुरु केल्या की सतत वाढतच जातात.

Monday, March 7, 2011

३१५. अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम् |

विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि ||

अर्थ

माझी काहीच चूक नाही असे [दुष्टांनी त्रास न देण्यास पुरेसे] कारण नाही. अत्यंत गुणी माणसांनाहि दुर्जनांपासून भीती असतेच. [दुष्टांना दुसऱ्याचं चांगलं पाहवत नाही व ते त्रास देतातच.]

३१४. उत्तमो नातिवक्ता स्यादधमो बहुभाषकः |

काञ्चने न ध्वनिस्तादृग्यादृक्कांस्ये प्रजायते ||

अर्थ

थोर माणूस फार बोलत नसतो. अति बडबड करतो तो क्षुद्र असतो. काश्याच्या भांड्याचा जेवढा आवाज येतो; तेवढा सोन्याचा येत नाही.

३१३. धन्या केयं स्थिता ते शिरसि ? शशिकला; किन्नु नामैतदस्याः ? नामैवास्यास्तदेतत्परिचितमपि ते विस्मृतं कस्य हेतोः |

नारीं पृच्छामि नेन्दुं ; कथयतु विजया न् प्रमाणं यदीन्दुर्देव्या निन्होतुमिच्छोरिति सुरसरितं शाठ्यमव्याद्विभोर्वः ||

अर्थ

'ही कोण बरं तुमच्या डोक्यावर बसलीय? धन्य [आहे बाई]', [ही तर] शशिकला', 'हे तिचे नाव आहे काय?', ' हो हे तिचे नावच आहे. तुला ते चांगले माहित आहे विसरलीस काय?'. 'मी स्त्री बद्दल विचारतेय चन्द्रकलेबद्दल नाही.' [येथे विचारणे हे क्रियापद द्विकर्मक असल्याचा फायदा घेऊन शंकरांनी असा अर्थ घेतला मी स्त्रीला विचारीन चंद्राला नाही] 'ठीक आहे चंद्रावर विश्वास नसेल तर विजयेला सांगू देत' - अशा रीतिने गंगेला पार्वतीपासून दडवून शिवाने लबाडी केली - [भगवान शंकर] तुमचे रक्षण करो.

Thursday, March 3, 2011

३११. संध्यासलिलाञ्जलिमपि कङ्कणफणिपीयमानमविजानन् |

गौरीमुखार्पितमना विजयाहसितः शिवो जयति ||

अर्थ

पार्वतीच्या मुखाकडे लक्ष असल्यामुळे संध्याकाळच्या [सन्ध्येतील] अर्घ्याचे पाणी हाताला वेटोळे घातलेल्या सर्पाने प्यालेले लक्षात न् आल्यामुळे [ज्याला] विजया [पार्वतीची सखी] हसली अशा भगवान शंकराचा [नेहमी] विजय होतो.

३१०. अहिभूषणोऽप्यभयदः सुकलितहालाहलोंऽपि यो नित्यः |

दिग्वसनोऽप्यखिलेशस्तं शशधरशेखरं वन्दे ||

अर्थ

[भीतिदायक असे] सर्प हेच अलंकार असूनही जो [प्राणिमात्रांना] भीती मधून मुक्त करतो, हलाहलासारखे जहरी विष पिऊन सुद्धा जो अमर आहे, दिगंबर असूनही जो सर्व जगाचा स्वामी आहे, अशा चंद्राला डोक्यावर धारण करणाऱ्या [महादेवाला मी] वन्दन करतो.

Wednesday, March 2, 2011

३०९. न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते |

गृहं तु गृहिणीहीनं कान्तारादतिरिच्यते ||

अर्थ

[दगडविटांनी बांधलेले] घर म्हणजे घर नव्हे तर त्यातील घरधनीण म्हणजे घर. गृहिणी नसलेले घर म्हणजे अरण्याहुनही भयंकर स्थान असते.

Monday, February 28, 2011

३०८. दुर्जनैरुच्यमानानि सस्मितानि प्रियाण्यपि |

अकालकुसुमानीव भयं संजनयन्ति हि ||

अर्थ

दुष्ट मनुष्य हसून गोडगोड बोलू लागला, तरी वेलीला अवेळी लागलेल्या फुलांप्रमाणे भीती उत्पन्न करतो. [योग्य वेळेच्या आधी फुले आली तर फळे धरत नाहीत. त्याप्रमाणे भाषण गोड असले तरी उपयोग होणार नाही. कदाचित त्रास सुद्धा होऊ शकेल ही भीती असते.]

३०७. प्रतिक्षणमयं कायः क्षीयमाणो न लक्ष्यते |

आमकुम्भ इवाम्भस्थो विशीर्णः सन्विभाव्यते ||

अर्थ

हा देह क्षणाक्षणाला झिजतोय पण कळत नाही. पाण्यात ठेवलेला कच्चा माठ जसा फुटला की, त्याचे तुकडे तुकडे झाले की मगच कळते. तशी या देहाची झीज पराकोटीला गेली की मगच कळते. [मृत्यु अचानक आला असं वाटत पण हळू हळू तो जवळ येत असतो.]

Wednesday, February 23, 2011

३०६. प्रस्तावसदृशं वाक्यं सद्भावसदृशं प्रियम् |

आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः ||

हितोपदेश

अर्थ

संदर्भाला योग्य असे भाषण करणे, चांगली [सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या] गोष्ट म्हणून ती आवडणे, राग ताब्यात ठेवणे, या गोष्टी करणारा ज्ञानी [हुशार] होय.

Tuesday, February 22, 2011

३०५. निर्माय खलजिह्वाग्रं सर्वप्राणहरं नृणाम् |

चकार किं वृथा शस्त्रविषवह्नीन् प्रजापतिः ||

अर्थ

मनुष्याचे सर्व आणि प्राण हरण करणारे असे दुर्जनाच्या जिभेचे टोक ब्रह्मदेवाने निर्माण केल्यावर प्राणघातक शस्त्रे, विष अग्नि ह्या वस्तू उगाचच का बरे निर्माण केल्या? [दुर्जनाचे बोलणे हे त्या गोष्टींपेक्षाहि भयंकर आहे असा भाव]

३०४. जितरोषरया महाधियः सपदि क्रोधजितो लघुर्जनः |

विजितेन जितस्य दुर्मतेर्मतिमद्भिः सह का विरोधिता ||

माघ शिशुपालवध

अर्थ

क्रोधाच्या आवेगांवर बुद्धीमंतानी विजय मिळवलेला असतो. क्षुद्र माणसे लगेच क्रोधाच्या आहारी जातात. अशा [क्रोध ताब्यात ठेवणाऱ्या] बुद्धिमान लोकांबरोबर [क्रोधाने ज्यांच्यावर विजयं मिळवलेला आहे अशा] पराभूत माणसांना वैर करणं काय जमणार? [मैत्री होणे तर शक्यच नाही.]

३०३. हस्तमुत्क्षिप्य यातोऽसि बलात् कृष्ण किमद्भुतम् |

हृदयाद्यदि निर्यासि पौरुषं गणयामि ते ||

सूरदास

अर्थ

[सूरदास श्रीकृष्णाचे महान भक्त होते. त्यांच्याबरोबर देव सतत रहात असे. एकदा असेच त्यांच्या मांडीवर असताना देव पळून गेला. दृष्टीहीन सुरदास त्याला पकडू शकले नाहीत. तेंव्हा ते म्हणाले] हे कृष्णा, हात झटकून बळजबरीने पळालास यात काय नवल? तु जर माझ्या हृदयातून जर निघून गेलास तर तुझं कर्तृत्व मी मान्य करीन [ते इतके निस्सीम भक्त होते की देवाचा निवास त्यांच्या हृदयात पक्का होता.]

३०२. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |

निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ

ज्या ठिकाणी विद्वान् लोक नाहीत तेथे कमी बुद्धी असलेला माणूसदेखील स्तुतीला पत्र ठरतो. जसे जेथे [मोठे] वृक्ष नाहीत अशा प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

३०१. कराग्रे वर्तते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती |

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ||

अर्थ

हाताच्या [बोटांच्या] टोकाशी लक्ष्मीचा वास असतो, तळ हातामध्ये सरस्वती राहते आणि हाताच्या [दुसऱ्या] टोकाला [मनगटापाशी गोविंदाचा निवास असतो. [म्हणून] पहाटे [उठल्या उठल्या] हाताचे दर्शन घ्यावे.

३००. परदुःखं समाकर्ण्य स्वभावसरलो जनः |

उपकारासमर्थत्वात् प्राप्नोति हृदये व्यथाम् ||

अर्थ

दुसऱ्यावरचे दुःखद प्रसंग ऐकल्यावर उपकार करण्यास असमर्थ असल्यामुळे थोर माणसाला मनात तळमळ लागून राहते.

२९९. उत्तमः क्लेशविक्षोभं क्षमः सोढुं न हीतरः |

मणिरेव महाशाणघर्षणं न तु मृत्कणः ||

अर्थ

श्रेष्ठ पुरुषच [शारीरिक व मानसिक] क्लेशांचे आघात सहन करण्यास समर्थ असतो. इतर [क्षुद्र माणसांना] ते जमणार नाही, जसे उत्कृष्ट रत्नच मोठ्या दगडावरचे घर्षण सोसू शकते, मातीचे ढेकूळ ते सहन करू शकत नाही.

Saturday, February 12, 2011

२९८. यदि न स्यान्नरपतिः सम्यङ् नेता ततः प्रजाः |

अकर्णधारा जलधौ विप्लवेतेह नौरिव ||

अर्थ

राजा [राज्याचा प्रमुख] हा जर चांगला नेता मुत्सद्दी नसेल तर समुद्रातील नावाडी नसलेल्या नावेप्रमाणे प्रजा भरकटत जाईल.

२९७. लुब्धो न विसृजत्यर्थं नरो दारिद्र्यशङ्कया |

दातापि विसृजत्यर्थं तयैव ननु शङ्कया ||

अर्थ

पैसे [दान केल्यामुळे] गरिबी येईल या भीतीने कंजूस मनुष्य ते दान करीत नाही. तर उदार माणूस [संपत्ति गेली तर नंतर दान करता येणार नाही अशा] त्याच भीतीने संपत्ति दान करत राहतो.

२९६. काचः काञ्चनसंसर्गाद् धत्ते मारकतीं द्युतिम् |

तथा सत्संनिधानेन मुर्खो याति प्रवीणताम् ||

अर्थ

सोन्याच्या संगतीत [सोन्याच्या कोंदणात बसवल्यामुळे साधी] काचसुद्धा पाचूचे तेज धारण करते. त्याप्रमाणे चांगल्या सहवासात मूर्ख सुद्धा सुज्ञ होतो.

Tuesday, February 8, 2011

२९५. उद्यमेन विना राजन् न सिध्यन्ति मनोरथाः |

कातरा इति जल्पन्ति यद् भाव्यं तद् भविष्यति ||

अर्थ

हे राजा, इप्सित गोष्टी प्रयत्न केल्याशिवाय पुऱ्या होत नाहीत. भित्रे लोक मात्र 'जे व्हायचे असेल ते होईल' असे म्हणतात.

२९४. अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठतः |

स्वकार्यमुद्धरेत् प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता ||

अर्थ

अपमान स्वीकारून, गर्व बाजूला ठेऊन शहाण्या माणसाने आपल काम तडीस न्याव [मान अपमानाचा विचार करून] कामाचा नाश करणं हा मूर्खपणा आहे.

२९३. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |

इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न ते विपदा ||

अर्थ

वृक्ष तोडला तरीसुद्धा तो पुन्हा वाढतो आणि चन्द्र क्षीण झाला तरीदेखील तो पुन्हा हळूहळू मोठा होतो असा विचार करून सज्जन संकटाने कधीही खचून जात नाहीत.

२९२. वासः प्रधानं खलु योग्यतायाः वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः |

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ||

अर्थ

खरोखर योग्यता समजण्याच्या बाबतीत पोशाख महत्वाचे [काम] करतो. कपडे [चांगले नसतील त्याचा लक्ष्मी देखील त्याग करते [विष्णूचा] पितांबर [झुळझुळीत वस्त्र] पाहून सागराने त्याला स्वतःची मुलगी दिली तर दिगंबर अशा [दिशा हेच वस्त्र असणाऱ्या शंकराला] पाहून त्याने विष दिले.

२९१. यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता साऽप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः |

अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ||

राजा भर्तृहरि

अर्थ

[अशी आख्यायिका आहे की त्या राजाच्या दरबारात एक यती आला आणि त्यानी राजाला एक अप्रतीम फळ दिलं. हे खाऊन तु अमर होशील असं सांगितलं. राजाला पत्नी फार प्रिय असल्यामुळे त्याने ते राणीला दिलं. तिनी ते ठेवून दिलं आणि नंतर प्रधानाला दिलं. प्रधानाने त्याच्या आवडत्या दासीला दिलं आणि तिनी पुन्हा ते लपवून परत राजालाच दिलं. त्यामुळे राजा एकदम विरक्त झाला]

मी जिचा नित्य विचार करतो ती माझ्याबाबत उदास आहे, तिला दुसऱ्याच माणसाची आवड आहे तो तिसरीवरच प्रेम करतो आणि आमच्यासाठी सुद्धा वेगळीच स्त्री झुरते आहे. तिचा [राणीचा], त्याचा [प्रधानाचा, असा बेबनाव करणाऱ्या] मदनाचा, हिचा [दासीचा] आणि माझा सुद्धा धिक्कार असो.

२९०. यदा किञ्चिज्ज्ञोऽहं द्विप इव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः |

यदा किञ्चित्किञ्चिद् बुधजनसकाशादवगतं तदा मुर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः ||

राजा भर्तृहरि नीतिशतक

अर्थ

जेंव्हा मी अगदी थोडस शिकलो तेंव्हा मी अगदी सर्वज्ञ आहे असा मला गर्व झाला. मी हत्तीप्रमाणे मदांध झालो. [नंतर] जेंव्हा मी, थोडा थोडा ज्ञानी लोकांच्या सहवासात आलो, तेंव्हा मला समजलं [की खरं तर] मी मूर्खच आहे. [आणि] ताप ज्याप्रमाणे उतरतो त्याप्रमाणे माझा माज निघून गेला.

Thursday, February 3, 2011

२८९. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान्पूरयितुं समर्थः |

अन्यैर्नृपैर्यद् परिदीयमानं शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात् ||

पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

[आमचं] ईप्सित पूर्ण करण्यास एक तर दिल्लीचे राजे [शहाजहान] किंवा जगाचा स्वामी समर्थ आहे दुसऱ्या राजांनी जरी सर्वतोपरी दिलं तरी ते [फक्त] मिठापुरतं किंवा [फार तर फार] भाजी पुरतं होईल.

Tuesday, February 1, 2011

२८८. मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः |

बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्‌ ||

अर्थ

[आपले] मन हेच मुक्ती आणि बन्धन याला कारणीभूत असते. ते विषयात गुंतलेले असते त्यामुळे ते अडकते आणि जर ते आसक्त नसेल तर ते मुक्तच आहे असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

Monday, January 31, 2011

२८७. यदेवोपनतं दुःखात्सुखं तद्रसवत्तरम् |

निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य हि विशेषतः ||

अर्थ

दुःखानंतर जर सुखाचे [प्रसंग आयुष्यात] आले तर ते अधिक मधुर वाटतात. जसं उन्हातून [तापून आल्यावर] झाडाची सावली अधिक आनंददायी वाटते.

२८६. येषां बाहुबलं नास्ति येषां नास्ति मनोबलम् |

तेषां चन्द्रबलं देव किं कुर्यादम्बरस्थितम् ||

अर्थ

महाराज ज्यांच्या शरीरात ताकद नाही, ज्यांचे मन खंबीर नाही [इतक्या स्वाधीन आणि जवळ असणाऱ्या गोष्टींचा जे उपयोग करून घेत नाहीत त्यांना] आकाशात असणाऱ्या चंद्राच्या [ज्योतिषाच्या मुहुर्तामुळे मिळणाऱ्या] बलाचा काय उपयोग होणार?

Friday, January 21, 2011

२८५. शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च |

दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम् ||

अर्थ

दुःख देणाऱ्या हजारो गोष्टी; भीती वाटेल अशा शेकडो गोष्टी मूर्खाला त्रास देतात. [पण] विद्वान् माणसांना त्रास देत नाहीत. [ज्ञानी लोक संकटाचा आधीच विचार करून उपाय करतात किंवा विवेकाने दुःखात बुडून जात नाहीत.]

२८४. अणुभ्यश्च महद्भयश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः |

सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ||

अर्थ

ज्याप्रमाणे भुंगा फुलातून [सर्वात चांगली वस्तू असा] मध गोळा करतो, त्याप्रमाणे लहान किंवा मोठ्या शास्त्रामधून हुशार माणसाने सार ग्रहण करावे.

Wednesday, January 19, 2011

२८३. दंष्ट्राविरहितो नागो मदहीनो यथा गजः |

सर्वेषां जायते वश्यो बलहीनस्तथा नृपः ||

अर्थ

[विषारी ] दात पडलेला साप; मस्तवाल नसलेला हत्ती त्याचप्रमाणे सामर्थ्यहीन राजा सर्वांच्या वश जातो. [परवश होतो]

२८२. सुवर्णपुष्पितां पृथ्वीं विचिन्वन्ति त्रयो जनाः |

शूरश्च कृतविद्यश्च यश्च जानाति सेवितुम् ||

अर्थ

तीन प्रकारचे लोक पृथ्वीवरील अतिशय चांगल्या गोष्टी मिळवतात. [जगातील सोनेरी, उत्कृष्ट वस्तूंचा शोध करतात ] पराक्रमी; सुशिक्षित आणि [मिळालेली संधीचा फायदा] घेण्याची बुद्धी असणारे.