भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 31, 2012

६८८. दिवा पश्यति नोलूको काको नक्तं न पश्यति |

अपूर्व: कोऽपि कामान्धो दिवा नक्तं न पश्यति ||

अर्थ

घुबडाला दिवसा दिसत नाही. कावळ्याला रात्री दिसत नाही. [हे तरी बरं] कामान्धांच अगदी आश्चर्यच आहे, त्यांना दिवस आणि रात्र दोन्ही दिसत नाही. [दोन्ही वेळा तो कुकृत्य करत.]

६८७. उपकारगृहीतेन शत्रुणा शत्रुमुद्धरेत् |

पादलग्नं करस्थेन कण्टकेनैव कण्टकम्  ||

अर्थ

ज्याप्रमाणे हातात रुतलेला काटा काढून त्याच काट्याने पायातला काटा काढून टाकता येतो, त्याप्रमाणे आपण ज्याच्यावर उपकार केलेले आहेत अशा एका शत्रूकडून दुसऱ्या शत्रूचा पाडाव करावा.

Tuesday, May 29, 2012

६८६. धर्मो जयति नाधर्म: सत्यं जयति नानृतम् |

क्षमा जयति न क्रोधो देवो जयति नासुर; ||

अर्थ

[नेहमी] धर्माचाच विजय होतो; अधर्माचा होत नाही. ख-याचा विजय होतो; खोट्याचा होत नाही. रागावण्याचा विजय होत नाही तर क्षमा करण्याच होतो. देवाचा [सत्प्रवृत्तींचा] विजय होतो, राक्षसांचा [दुष्प्रवृत्तींचा] पराजय होतो.

Monday, May 28, 2012

६८५. अहो नु कष्टं सततं प्रवास: ततोऽतिकष्ट: परगेहवास: |

कष्टाधिका नीचजनस्य सेवा ततोऽतिकष्टा धनहीनता च ||

अर्थ

अहो; नेहमी प्रवास करणे कष्टदायक आहे; त्यापेक्षाही दुसऱ्याच्या घरी राहणे जास्त कष्टदायक आहे. नीच माणसाची सेवा करणे पण फारच खडतर आहे. दारिद्र्य हे या सर्वात अतिशय कष्टकारक आहे.

६८४. घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारूगन्धं छिन्नं छिन्नं पुनरपि पुन: स्वादु चैवेक्षुकाण्डम् |

दग्धं दग्धं पुनरपि पुन: काञ्चनं कान्तवर्णं प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||

अर्थ

चंदन जसजसे घासावे तसतसे ते [अधिकच] सुगंध देऊ लागते. उसाचे कांडे जसजसे अधिक कापू तसतसे जास्त गोड होत जाते. सोने जसजसे पुन्हा पुन्हा तापवावे तसे अधिक लखलखते. त्याप्रमाणे थोर लोकांना [कितीही त्रास दिला] अगदी प्राण जाण्याची वेळ आली तरी त्यांचा स्वभाव बदलत [बिघडत] नाही.

Saturday, May 26, 2012

६८३. अन्यस्माल्लब्धपदो नीचो प्रायेण दु:सहो भवति |

रविरपि न दहति तादृक् यादृक् दहति वालुकानिकर:|| अर्थ दुसऱ्याकडून मिळालेल्या अधिकाराच्या जागेवरील नीच मनुष्य बहुधा अतिशय तापदायक होतो. [सूर्याच्या उन्हाने तापलेला] वाळूचा ढिगारा जेवढा दाहक असतो तेवढा प्रत्यक्ष सूर्य सुद्धा भाजत नाही.

Friday, May 25, 2012

६८२. नाद्रव्ये निहिता काचित्क्रिया फलवती भवेत्‌ |

न हि व्यापारशतेनापि शुकवत्पाठ्यते बक: ||

अर्थ

अयोग्य वस्तूच्या [किंवा व्यक्तीच्या] बाबतीत केलेले प्रयत्न [त्याच्यावर घेतलेली मेहनत] फलदायी होत नाही. शेकडो प्रयत्न करून हि बगळ्याला पोपटाप्रमाणे [बोलायला] शिकवता येत नाही [संस्कार किंवा शिक्षण हे जसं जरुरी आहे तसंच ज्याला घडवायचं आहे तो माणूस सुद्धा तेवढा सक्षम पाहिजे, नाहीतर त्या परिश्रमांचा काही उपयोग होणार नाही.]

Thursday, May 24, 2012

६८१. अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना |

त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम् ||

अर्थ

ज्या ठिकाणी अयोग्य व्यक्तींचा आदर केला जातो पण आदरणीय व्यक्तींचा अपमान होतो त्या ठिकाणी दुष्काळ, मरण आणि भीती या तीन गोष्टी ओढवतात.

६८०. कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुण: प्रमार्ष्टुम् |

अधोमुस्यापि कृतस्य वह्नेर्नाध: शिखा यान्ति कदाचिदेव ||

अर्थ

धीराच्या माणसाला जरी गरिबी आली तरीसुद्धा त्याच धैर्य गळून पडेल हे कधीच शक्य नाही. अग्निला [बळाने] खाली वाकवलं तरी [उदा. मशाल जमिनीकडे वळवली तरी] त्याच्या ज्वाळा कधी खाली जात नाहीत. [वरच उफाळून येतात.]

Tuesday, May 22, 2012

६७९. भूमि: शस्त्रबलार्जितेति विदिता; रामेण सिन्धोः पुरा पुण्यश्लोकजनि: खनिश्च महती मानुष्यरत्नाश्मनाम् |

पूता सिद्धतपोधनाश्रमपदैर्या पुण्यभू: सेविता प्राज्ञै: कोङ्कणसंज्ञितेयममला देवर्षिसङ्घैर्मुदा ||
अर्थ

ही  भूमि पुराणकाळी परशुरामाने शास्त्राच्या बळावर सागराकडून मिळवलेली आहे असे प्रसिद्ध आहे. ही किर्तीवंत लोकांची जन्मदात्री नररत्नांची खाण आहे. सिद्ध आणि तपस्वी लोकांच्या आश्रमांमुळे  ही पुण्यभूमि राहण्यास योग्य व त्यामुळे पवित्र झाली आहे. विद्वान तसेच देव आणि ऋषी यांच्या समूहांनी आनंदाने या शुद्ध आणि पवित्र भूमीला कोकण असे नाव दिले आहे.

Sunday, May 20, 2012

६७८. सह्यसिन्ध्वोर्मध्यवर्ति प्रदेशं दक्षिणोत्तरम् |

लोका: कोङ्कणमित्याहुस्त्वपरान्तं पुराविद: ||
बहिस्तु कण्टकैर्युक्ता अन्त: स्वादुरसान्विता; |
गृहे गृहेऽत्र  दृश्यन्ते  पुरुषा: पनसा इव ||

अर्थ

दक्षिणोत्तर पसरलेल्या; समुद्र व सह्याद्री यामधील या प्रदेशाला लोक कोकण असे म्हणतात. जाणकार 'अपरान्त' असे म्हणतात. येथील घरा घरातील माणसे; फणसाप्रमाणे बाहेरून काटेरी आणि आत गोड रसाने संपृक्त असतात.  [त्यासारखीच असलेली दिसतात]

६७७. अध: करोषि रत्नानि मूर्ध्ना धारयसे तृणम् |

अगुणज्ञोऽसि नितरां रत्नं रत्नं तृणं तृणम् ||

अर्थ

रत्नांना खाली [तळाशी जागा] देतोस; आणि शेवाळाला [डोक्या]वर घेतोस [अरे सागरा] अगदी गाजरपारखी आहेस [खरं म्हणजे] रत्न ते रत्नच आणि गवताला गवताचीच [किमत द्यायला हवी.]

सागरान्योक्ती सागर = अगदीच गुणांची पारख नसलेला मनुष्य.

६७६. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन: |

चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् ||

अर्थ

नेहमी वडिलधाऱ्यांची सेवा करणाऱ्या आणि वंदन करण्याचा स्वभाव असणाऱ्या [नम्र] माणसाचे आयुष्य; ज्ञान; कीर्ति आणि ताकद हे [सतत] वाढतच राहतात.

६७५. चातकस्त्रिचतुरान्पय: कणान् याचते जलधरं पिपासया |

सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ||

अर्थ

तहानल्यामुळे चातक [अगदी थोडेसे] चार पाच थेंब पाणी मेघाकडे मागतो. तो [मेघ] सर्व जगच पाण्याने भरून टाकतो. ओहो! केवढे हे थोर [महात्म्यांचे] औदार्य! [मेघान्योक्ती; मेघ = दाता; चातक = याचक ]

६७४. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया: किमपि तन्महैश्वर्यं लीलाजनितजगत: खण्डपरशो:|

श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं न: शमयतु || गङ्गालहरी पण्डितराज जगन्नाथ

अर्थ

सर्व पृथ्वीचे अवर्णनीय सौंदर्य असलेले; विशाल जग सहजपणे निर्माण करणाऱ्या शंकराचे मोठे ऐश्वर्य असलेले; वेदांचे सर्व सारच; देवांचे मूर्तिमंत पुण्यच; अमृताप्रमाणे मधुर असणारे तुझे पाणी आमचे अकल्याण दूर करो.

[पण्डितराजांनी लवंगीकेला पत्नी म्हणून स्वीकारल्यावर वाराणसीच्या सनातन्यांनी त्यांना वाळीत टाकले खूप वाईट वाटून ते गंगेवर आले पण त्यांना कोणी किनाऱ्याजवळ येऊ देईना तेंव्हा ते पत्नीसह घाटाच्या वर बावन पायऱ्या वर बसलेले असतात आणि गंगालहरीचा हा पहिला श्लोक म्हणतात तेंव्हा गंगा एक पायरी वर येते. अस एकेका श्लोकाबरोबर एक एक पायरी वर येऊन ते जिथे बसले होते तिथेच त्यांना अंघोळ घालून तिनी त्यांना पावन करून घेतले अशी आख्यायिका आहे.]

६७३. किं नि:शङ्कं शेषे शेषे वयस: समागते मृत्यौ |

अथवा सुखं शयीथा निकटे जागर्ति जाह्नवीजननी || अप्पय दीक्षित

अर्थ

[पण्डितराज जगन्नाथ यवनी पत्नी बरोबर गंगेच्या तीरावर झोपले असता त्यांना उद्देशून अप्पय दीक्षितांनी असे म्हटले मग पण्डित राजांना फार दु:ख झालं आणि त्या तळमळीत त्यांनी गंगालहरी हे अतिशय सुंदर स्तोत्र रचले अशी आख्यायिका आहे.]

मरण जवळ आलेले असताना; [थोडसंच] आयुष्य शिल्लक असताना बेघोर झोपालयात काय? [काही चिन्ता कशी वाटत नाही?] किंवा झोपा खुशाल [तुमची काळजी घ्यायला गंगामाई जवळच [आणि] जागृत आहे.

६७२. अहमस्मि नीलकण्ठस्तव खलु तुष्यामि शब्दमात्रेण |

नाहं जलधर भवतश्चातक इव जीवनं याचे ||

अर्थ

हे [जलाने संपृक्त असलेल्या] मेघा; मी खरोखर मी - मोर तुझा आवाज ऐकूनच [मला] आनंद होतो मी आपणाकडून चातकासारखी जीवनाची [पाण्याची; सगळ्या आधाराची] मागणी करीत नाही. [मयुरान्योक्ती मित्र हा काही मागत नाही केवळ भेट - प्रेम असतं; यांनीच मित्राला आनंद होतो.]

६७१. काल: पचति भूतानि, काल:संहरते प्रजा: |

काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रम: ||

अर्थ

काल [समय] हा [पंचमहा] भूतांवर परिणाम करतो. [लहानांना मोठे करतो; म्हातारे करतो; बदलवतो ]; काल हा प्राणिमात्रांचा नाश करतो; [आपण] बेसावध राहिलो तरी काळ हा जागृत असतो. [आणि त्याच कार्य तो करीतच राहतो] काळावर [विजय मिळवणे] अशक्य आहे.

६७०. उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते |

प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत् ||

अर्थ

उपसर्गामुळे [संस्कृत भाषेमध्ये क्रियापदाच्या अलीकडे लागतात असे २२ उपसर्ग आहेत.] धातूंचा अर्थ बळजबरीने दुसरीकडे नेला जातो [याच उदाहरण हृ {१प.} याचा अर्थ हरण करणे; पळवणे] त्याला प्र हा उपसर्ग लागला की प्रहार - घाव घालणे आ + हृ खाणे; सं+हृ -नाश करणे किंवा गोळा करणे; वि + हृ - हिंडणे; क्रीडा करणे; परि + हृ - [श्रम] परिहार असे धातूंचे अर्थ बदलतात.

६६९. विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च |

व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च ||

अर्थ

प्रवासाला गेलेलं असताना विद्या हीच मित्र असते. [आपले नातेवाईक; मित्र उपयोगी पडायला जवळ नसतात; पण आपल्या ज्ञानाचा वाटेत उपयोग होतो त्याची मदत होते म्हणून ती मित्र; घरात पत्नी हीच मित्र असते; आजाऱ्याला औषध हेच मित्र होय. मृत्यू पावल्यावर [मात्र बाकी कुणीच उपयोगी पडत नाही] आपण केलेली सत्कर्म हेच आपले मित्र. [त्या पुण्याचा उपयोग होतो.]

६६८. जीवन्तु मे शत्रुगणा: सदैव येषां प्रसादात्सुविचक्षणोऽहम् |

ये ये यथा मां प्रतीबाधयन्ति ते ते तथा मां प्रतिबोधयन्ति ||

अर्थ

ज्यांच्या कृपेमुळे मी चांगलाच शहाणा [सूज्ञ] झालो त्या माझ्या शत्रुसमुदायाला [दीर्घ] आयुष्य लाभो. ते जसे जसे मला छळतात तसतसे मला शहाणे करतात. [नातेवाईकाना दोष एवढे दिसत नाहीत; पण शत्रूमुळे दोष कळतात आणि कवि ते सुधारतो आणि त्यांच्या विरोधामुळे इतर अधिक ज्ञान सुद्धा प्राप्त होते.]

Tuesday, May 8, 2012

६६७. विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् |

पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं तत: सुखम् ||

अर्थ

विद्या [माणसाला] नम्रपणा शिकवते; त्यामुळे लायकी प्राप्त होते; लायकी असल्यामुळे संपत्ती मिळवता येते; त्यामुळे चांगलं धार्मिक [दानधर्म तीर्थयात्रा वगैरे] करता येतात आणि [माणूस] सुखी होतो.

६६६. एक एव खगो मानी चिरं जीवतु चातक: |

म्रियते वा पिपासार्त: याचते वा पुरन्दरम् ||

अर्थ

अतिशय स्वाभिमानी असा एकच चातक पक्षी आहे [त्याला] प्रदीर्घ आयुष्य लाभो. तो एक तर इंद्राच्या [मेघाकडे] याचना करतो आणि [जर त्यांनी पाऊस पाडला नाही तर] मरून जातो [पण दुसऱ्या कोणाकडे तोंड वेंगाडत नाही; अशी कवि कल्पना आहे की चातक पक्षी फक्त ढगातून पडणारं ताज पाणीच पितो नद्या; तलाव; विहिरी यातलं पाणी तो कधीही पीत नाही.]

Monday, May 7, 2012

६६५. अश्व: शस्त्रं शास्त्रं वीणा वाणी नरश्च नारी च |


पुरुषविशेषं प्राप्य भवन्ति योग्यायोग्याश्च ||

अर्थ

घोडा; शास्त्र; शस्त्र; वाद्य; भाषा; पुरुष आणि स्त्री [हे सर्व] ज्याच्या हातात पडतात [जो त्यांना कामावर ठेवतो किंवा त्यांच्यावर मेहनत घेऊन त्यांना सुसंस्कारित करतो त्याच्या] त्यावर ते थोर किंवा निरुपयोगी किंवा वाईट ठरतात.

६६४. ईर्ष्यी घृणी त्वसन्तुष्ट; क्रोधनो नित्यशङ्कित: |


परभाग्योपजीवी च षडेते नित्यदु:खिता: ||

अर्थ

[दुसऱ्याचा] द्वेष करणारा; दया करणारा; असमाधानी; सतत शंका काढणारा; तापट; दुसऱ्याच्या नशिबावर जगणारा हे सहा जण नेहमी दु:खी असतात.

Friday, May 4, 2012

६६३. अयं रत्नाकरोऽम्भोधिरित्यसेवि धनाशया |

धनं दूरेऽस्तु वदनमपूरि क्षारवारिभि: ||

अर्थ

हा [सागर म्हणजे] रत्नांची खाण आहे असे [समजून मी] संपत्तीच्या आशेने आलो आणि [अरेरे] संपत्ती तर बाजूलाच राहिली तोंड मात्र [त्याच्या] पाण्यानी खारट झालं! [सागरान्योक्ती - एखाद्या कंजूष श्रीमंताकडे आशेने गेलेला कवि - याचक कसा वैतागतो ते ह्या सुभाषितामध्ये सुंदर रंगवलं आहे.]

Thursday, May 3, 2012

६६२. वर्णेन सौरभेणापि सम्पन्नं कुसुमं यथा |

क्रियया फलितं वाक्यं तथा लोके विराजते ||

अर्थ

ज्याप्रमाणे [सुंदर] रंग आणि सुवास यांनी युक्त असे फूल शोभून दिसते, त्याप्रमाणेच बोलण्याबरोबर कृती केल्याने ते बोलणं शोभून दिसत. [सगळ्यांना आवडत; क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे.]

६६१. दोषभीतेरनारम्भस्तत्कापुरुषलक्षणम् |

कैरजीर्णभयाद्भ्रातर्भोजनं परिहीयते ||

अर्थ

काहीतरी चुकेल या भीतीने [एखाद्या कामाला] सुरवातच करायची नाही हा भित्रेपणा आहे. अरे भाऊ अजीर्ण होईल म्हणून कोण बरं जेवायचच सोडून देतो?